भोसरी : येथील गावजत्रा मैदानावर खासगीरित्या इंद्रायणीथडी जत्रा भरविली जात आहे. त्या जत्रेत महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे स्टॉल लावण्यात येत आहेत. ते महापालिकेचे स्टॉल लावण्याचे काम तातडीने थांबविण्यात यावे, अन्यथा आपणांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांनी दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले.
महापालिकेच्या वतीने भोसरीतील साईबाबा मंदिराच्यासमोर ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगावर आधारीत शिल्पे बसविण्याचे सन 2012 मध्ये मंजुर करण्यात आले होते. ती शिल्पे बसविण्याचे काम सध्या चालू आहे. मात्र, भोसरीच्या आमदारांनी पवनाथडी जत्रेच्या धर्तीवर गावजत्रा मैदानावर खासगी इंद्रायणीथडी जत्रा भरविली आहे. त्यासाठी शहरातील महिला बचत गटांकडून अर्ज मागवून स्टॉल वाटप करण्यात येत आहेत. सदरील इंद्रायणीथडी जत्रेचा कार्यक्रम पूर्णपणे खाजगी आहे. त्या जत्रेशी महापालिकेचा कोणताही सहभाग नाही. तरी देखील मनपाच्या मालकीची ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज व इतर वारकर्यांची शिल्पे या जत्रेमध्ये अनधिकृतपणे ठेवण्यात आलेली आहेत.
मनपाची शिल्पे खाजगी जत्रेत कशासाठी…
हे देखील वाचा
मनपाच्या मालकीची सदरची शिल्पे खाजगी इंद्रायणीथडी जत्रेमध्ये कशी काय ठेवण्यात आली ? त्यासाठी आपण परवानगी दिली आहे काय? परवानगी दिली तर अनाधिकृतरीत्या हि शिल्पे इंद्रायणीथडीत ठेवण्यार्यांवर आपण काय कारवाई करणार? याबाबत सविस्तर खुलासा तीन दिवसांच्या आत देण्यात यावा. सदरची शिल्पे त्वरीत काढून घेण्यात यावीत.
जत्रेत मनपाचे स्टॉल लावू नयेत…
या खाजगी जत्रेमध्ये मनपा राबवित असलेले विविध प्रकल्पाचे स्टॉल मनपा लावणार आहे. या खाजगी जत्रेमध्ये मनपा स्वत:चे स्टॉल लावू शकते का? कारण मनपाच्या अधिकृत पवनाथडी जत्रेमध्ये अशा प्रकारचे स्टॉल कधी लावले गेले नाहीत. तसेच मोशी येथे दरवर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनास राज्यभरातून शेतकरीवर्ग व नागरीक येत असतात. तिथे कधीही मनपाच्या विविध विकास प्रकल्पाचे स्टॉल लागले नाहीत. मग या इंद्रायणीथडी या खाजगी जत्रेतच का स्टॉल लावले गेले याचा सविस्तर खुलासा करण्यात यावा. तसेच सदरची मनपाची स्टॉल लावण्याची कार्यवाही त्वरीत थांबविण्यात यावी. अन्यथा आपणांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी मागणी केली आहे.