भोसरी : गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई एमआयडीसी भोसरी पोलिसांनी इंद्रायणीनगर मिनी मार्केट येथे केली. भीमसिंग धनसिंग थापा (वय 21, रा. बिल्डिंग नंबर 10/3, हनुमान मंदिराच्या मागे, इंद्रायणीनगर, भोसरी) असे त्याचे नाव आहे.
पोलीस उप निरीक्षक रावसाहेब बांबळे गस्त असताना पोलीस शिपाई विजय दौंडकर यांना माहिती मिळाली की, इंद्रायणीनगर मधील मिनी मार्केटमध्ये एक तरुण येणार आहे. त्याच्याजवळ गावठी कट्टा आहे. या माहितीवरून पोलिसांनी मिनी मार्केट येथे सापळा लावून थापाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 100 रुपयांचा ऐवज मिळाला.