जत्रेच्या माध्यमातून ‘जय श्री राम’चा नारा; संघटनात्मक बांधणीसाठी लांडगेंचा अनोखा उपक्रम
पिंपरी चिंचवडकरांची मान अभिमानाने उंचवावी, अशा ‘इंद्रायणी थडी’ जत्रेकडे आता देशभरातील श्रीराम भक्तांचे लक्ष लागले आहे. अयोध्या येथे उभारण्यात येणार्या ऐतिहासिक श्रीराम मंदिराची प्रतिकृती जत्रेत साकारण्यात येणार आहे. त्यामुळे तमाम श्रीराम भक्तांसाठी ही यात्रा पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, भाजपा आमदार तथा नवनिर्वाचित शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी या जत्रेच्या माध्यमातून ‘जय श्री राम’चा नारा दिला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघांचे आमदार तथा पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रा आयोजित केली जात आहे. येत्या 30 व 31 जानेवारी आणि 1 व 2 फेब्रुवारी 2020 असे चार दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेत ही जत्रा भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील गावजत्रा मैदानावर होणार आहे. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी थीम घेवून यावर्षी ‘इंद्रायणी थडी’ जत्रा आयोजित केली जात आहे. तब्बल 800 स्टॉल उभारले जाणार आहेत. तुफान गर्दी होणार्या या जत्रेत अयोध्या येथे साकारणार्या ‘श्रीराम मंदिरा’ची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. आमदार लांडगे यांना पक्षाने नुकतील शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. हिंदुत्व आणि श्रीराम मंदिर हा भाजपाचा अजेंडा आहे. त्यानुसारच मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी सुरूवात करण्यात आली आहे.