इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजना काय? – आमदार लक्ष्मण जगताप

0

आजुबाजूच्या कंपन्या व झोपडपट्ट्यांमधील सांडपाणी थेट पवना व इंद्रायणी नदीपात्रात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथे औद्योगिक वसाहत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारखान्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे येथील नागरिकीकरणही वाढत चालले आहे. कारखान्यांमधील केमिकल आणि राखमिश्रीत पाणी आणि पिंपरी-काळेवाडी तसेच आजुबाजूच्या कंपन्या व झोपडपट्ट्यांमधील सांडपाणी थेट पवना व इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते असल्याचे दिसून येत आहे. कोणतीही प्रक्रीया न करता हे सांडपाणी सोडले जात असल्याने इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजना काय, असा प्रश्‍न सत्ताधारी आमदारांनीच केला आहे. सध्या सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनांत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी या संदर्भात तारांकित प्रश्‍न विचारला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील जीवनदायिनी असलेल्या पवना नदीला दिवसेंदिवस जास्त प्रदुषण वाढते आहे. शहरातील वाढते औद्योगिकीकरणामुळे, वाढते नागरिकीकरण यामुळे शहरातील पवना नदीमध्ये सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी तसेच सोडले जाते. हे मैलामिश्रीत वाढलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे नदीतील पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. ही नदी नसून गटारगंगा झाली आहे. पवना नदीतील पाणी दुर्गंधीत, प्रदूषित व गटारमय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने नदीपात्रात सोडले जाणारे लाखो लिटर सांडपाणी व मैलापाणी पाण्यावर प्रक्रिया होत नसल्याचे दिसत आहे. या पाण्यावर पिंपरी-चिंचवडकरांचा अधिकार असला तरी ठिकठिकाणी सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे पाणी खुपच प्रदुषित झाले आहे. शहरात निर्माण होणारे सांडपाणी आणि मैलापाण्याच्या तुलनेत कार्यरत असलेली मलनिःस्सारण प्रक्रिया केंद्रे अपुरी आहेत.

नदी कृती योजनेची अंमलबजावणी

राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले की, नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नदी कृती योजनेची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येत आहे स्पष्ट केले. त्याद्वारे नदी प्रदुषण कमी होण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. लवकरच त्यांची अंमलबजावणी करून नदी प्रदुषण कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.