इंद्रायणी पुलाचे काम लवकरच सुरू करणार

0

आमदार भेगडे यांनी दिली माहिती

टाकवे बुद्रुक : कान्हे-टाकवे परिसरात असणार्‍या इंद्रायणी नदीवरील पुल आहे. हा पूल जीर्ण होत चालला असून पुलाची रुंदी कमी असल्याने पुलावर वाहतूक कोंडी अनेकदा होत असते. टाकवे गावापासून सुमारे 40 गावांसह अनेक वाड्या-वस्तीवरील नागरीक रोजगारासाठी व दैनंदिन कामासाठी याच पुलाचा उपयोग करत असतात. त्यामुळे या पुलाचे काम येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी दिली. टाकवे-बेलज रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार बाळा भेगडे बोलत होते. युवकांनी पुलाविषयी माहिती विचारली असता येत्या ऑक्टोबर अखेर पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार, अशी माहिती देण्यात आली. या वेळी अमित असवले, रामनाथ असवले, जितेंद्र असवले, अमोल शिंदे, निखिल भागरे, विशाल असवले, संतोष आबेकर, शेखर असवले आदी उपस्थित होते. पुलाचे काम वेळेत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा टाकवे येथील युवकांनी दिला.

पुल बंदचा फटका
मागील वर्षी घडलेल्या महाडच्या दुर्घटनेची पुनरावृती होऊ नये, अशी भावना सर्व सामन्य नागरिकांची आहे. तसेच पावसाळ्यात या पुलावरून अवजड वाहनावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत असल्यामुळे टाकवे औद्योगिक वसाहतीमधील उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे काही उद्योगाने आपले स्थालातंर केले असल्याने या भागात बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. टेट्रा पॅक, इन्डुंरन्स, सिडीकेट या प्रमुख कंपन्या बंद झाल्यामुळे टाकवे औद्योगिक वसाहतीला मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी रोजगारानिमित्त आलेले परप्रांतीय मजूर अन्य ठिकाणी गेल्याने भाडेतत्वावर देण्यात येणार्‍या खोल्या आता रिकाम्या झाल्या आहेत. कित्येक खोली मालकाने केलेली गुंतवणूक तोट्याची ठरली आहे. गावातील प्रमुख बाजारपेठ ही मदावंली आहे. पुन्हा याठिकाणी पहिल्या सारखी परिस्थिती निर्माण करायची असल्यास इंद्रयणी पुलाचे काम सुरू झाले पाहिजे अशी येथील सर्व नागरिकांची मागणी आहे.