इंद्रायणी महाविद्यालयाचा प्राचार्यांची स्वेच्छानिवृत्ती

0

पुणे-माजी विद्यार्थिनीने खंडणी मागितल्या प्रकरणी चौकशी सुरु असलेले इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.डी.बाळसराफ यांनी अखेर स्वेच्छा निवृत्ती घेतली असून त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शुक्रवारी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळाने स्वीकारला. संस्थेच्या विश्वस्त पदाचाही राजीनामा त्यांनी दिला.

इंद्रायणी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी डी बाळसराफ यांना घरी बोलावून त्यांच्यासोबत जबरदस्तीने अश्लिल व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका माजी विद्यार्थिनीने 10 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या विद्यार्थिनीला तिच्या साथीदार मित्रासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथील एका महाविद्यालयात सापळा रचून अटक केली होती. सध्या या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी सुरु आहे.

दरम्यान, प्राचार्य बाळसराफ यांच्या कथित आक्षेपार्ह वर्तनाचे तीव्र पडसाद उमटून कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विश्वस्त मंडळाने प्राचार्य डॉ. दत्तात्रेय बाळसराफ यांना निलंबित करून चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

चौकशी होऊन कारवाई होण्यापूर्वीच बाळसराफ यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज कॉलेजच्या नियामक मंडळाकडे सादर केला. काल , शुक्रवारी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सभेत बाळसराफ यांचा अर्ज स्वीकारण्यात आला असून बाळसराफ यांनी संस्थेच्या विश्वस्त पदाचाही राजीनामा दिला.