इंधनाचे दर कमी न केल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा

0

पुणे : नरेंद्र मोदींनी अच्छे दिनाचे गाजर दाखवून सर्व सामान्य नागरिकांना विश्वासात घेवून सत्ता मिळविली. सरकारने पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणून त्यावरील दरवाढ कमी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड 6 जून नंतर सर्व पक्षीय महाराष्ट्र बंद करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनोज आखरे यांनी दिला. वाढत असलेल्या इंधन दरवाढीविरोधात संभाजी ब्रिगेड तर्फे झाशीची राणी चौकात धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, संदिप लहाने तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदींचे खोटे आश्वसन
आखरे म्हणाले की, नरेंद्र मोदींनी देशाला अच्छे दिनाचे गाजर दाखवून सर्व सामान्य नागरिकांना फसवलं, आणि खोटं बोलून देशाचे पंतप्रधान झाले. आज चार वर्ष झाली सरकारला. या सरकारने देशातील सामान्य नागरिकांना देशोधडीला लावले. आज महागाई, बेरोजगारीने वैतागलेल्या देशात मोदींच्या खोट्या आश्वसनाने जनतेचे कंबरडे मोडले आहे. राज्यासह देशाचा विकास भरकटला आहे. आज पेट्रोल ने शंभरी गाठली आहे तर डिझेलने पंचाहत्तरी. हेच मोदी सरकारचे चार वर्षातील अपयश आहे. सरकारने पेट्रोल व डिझेल GST मध्ये घेऊन दरवाढ कमी करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड ६ जुन नंतर सर्व पक्षीय महाराष्ट्र बंद करेल तसेच महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

मन की बात बोगस
या आंदोलनावेळी सरकारचा पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात निषेद करण्यात आला . तसेच घोषणाबाजी देखिल यावेळी करण्यात आली. याचबरोबर पंतप्रधानांची मन की बात बोगस असल्याचे पेट्रोल दरवाढीने सिद्ध झाले आहे व मोदी देशाला लुटत आहेत. सरकारने जनतेचे हाल समजून घेत तात्काळ दरवाढ रद्द करुन पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.