इंधनावरील वाढीव दराविरोधात बोदवडला भाजयुमोचे आंदोलन
राज्य सरकाने तातडीने पेट्रोलसह डिझेल दरवाढ कमी करण्याची मागणी
बोदवड : संपूर्ण देशात पेट्रोल व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे महाराष्ट्र हे राज्य असून जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ हे इंधनावरील कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकार्यांनी बोदवड तहसीलदार संचेती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधुन पेट्रोलवर आठ रुपये आणि डिझेलवर सहा रुपये कमी केल्याने राज्य शासनानेही दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
महागाईला आळा घालण्याची मागणी
राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर हा त्वरीत कमी करण्यात यावा जेणेकरून महागाईला आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल. 72 तासांमध्ये हे पाऊल उचलले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
मोर्चा प्रसंगी भाजपा शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, भाजपा शहर सरचिटणीस वैभव माटे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा कोषाध्यक्ष राम आहुजा, युवा मोर्चा शहराध्यक्ष अभिषेक झाबक, युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल माळी, ओबीसी जिल्हा चिटणीस चेतन तांगडे, सोशल मिडिया सह संयोजक उमेश गुरव, सागर गंगतीरे, संजय अग्रवाल, जीवन माळी, मयुर बडगुजर, सुधीर पाटील, विनोद रूपचंदानी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.