यावलमध्ये काँग्रेसचे आंदोलन ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘अच्छे दिन’चा केला निषेध
यावल- भाजपा सरकारला शनिवारी चार वर्ष सत्तेवर येऊन झाल्यानंतरही प्रत्यक्षात जनतेला ‘अच्छे’ तर सोडा ‘बुरे दिन’ आल्याने व महागाईचा आगडोंब उसळून इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्याने यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी फैजपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांना वाहनधारकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले तसेच पाकिस्तानकडून भारताने साखर आयात केल्याच्या निषेधार्थ वाहनधारकांना साखरही वाटप करण्यात आली.
सर्वसामान्यांचे ‘स्वप्न भंग’
जिल्हा परीषदेचे काँग्रेसचे गटनेता तथा यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी 11 वाजता फैजपूर रस्त्यावरील सुभानी पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आंदोलन केले. पेट्रोलसह डिझेलच्या दराने सर्वात उच्चांक गाठला आहे. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’अच्छे दिन’चे स्वप्न सर्वसामान्य नागरिकांना दाखवले होते. प्रचंड प्रमाणात दरवाढ झालेल्या पेट्रोल व डिझेलमुळे अप्रत्यक्षपणे इतर सर्व जीवनावश्यक वस्तू तसेच शेती मशागत ही महाग झाली आहे. या ’अच्छे दिन’चा आम्ही काँग्रेसकडून व नागरीकांकडून तीव्र शब्दात निषेध करतो, अशा घोषणा देत काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
यांचा आंदोलनात सहभाग
काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, नगरसेवक शेख असलम , हाजी गफ्फार शाह, मनोहर सोनवणे, प्रवीण घोडके, भगतसिंग पाटील, बशीर मोमीन, शेख युनूस, समाधान पाटील, जलील पटेल, अनिल जंजाळे, विवेक सोनार, सुशील फेगडे ,पराग धानोरे, मोहम्मद वसीम, जयेश चोपडे, निसार खान, लीलाधर सोनवणे, युवराज पाटील, समाधान महाजनसह मोठ्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
भुसावळात काँग्रेसतर्फे विश्वासघात दिवस साजरा
भुसावळ- जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे शनिवारी भाजपा सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशवासीयांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण न झाल्याने जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाने भाजपा सरकारचा निषेध करून विश्वासघात दिवस काळ्या फिती लावून साजरा केला. प्रसंगी माजी आमदार नीळकंठ फालक, जिल्हाध्यक्ष मो.मुनव्वर खान, योगेंद्रसिंग पाटील, फकरुद्दीन बोहरी, राजेंद्र पटेल, आर.जी.चौधरी, जे.बी.कोटेचा, नितीन पटाव, महेबूब खान, सलीम गवळी, विनोद शर्मा, चंद्रसिंग चौधरी, संजय खडसे, भीमराव तायडे, कल्पना तायडे, छाया बोंडे, अलका जैन, सायराबानो, यास्मिनबानो आदींची उपस्थिती होती.