नवी दिल्ली :- देशात पेट्रोल डिझेलने पाच वर्षातील सर्वाधिक उच्चांक गाठला असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८२ रुपये ५२ पैसे तर डिझलने लिटरमागे ७० रुपये २४ पैसे इतके दर गाठले. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास केंद्रीय अर्थ खाते तयार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना तुर्तास दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. दररोज इंधन दरवाढ नवा उच्चांक गाठत असल्याने सामान्य जनतेमधून सरकारबद्दल रोष व्यक्त होत आहे.
बुधवारी कच्चा तेलाच्या दराने नोव्हेंबर २०१४ नंतरचा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत (सुमारे ५ हजार ३१४ रुपये) पोहोचले आहेत. काही तज्ज्ञांनी तर कच्चा तेलाचे दर १०० डॉलरच्या घरात जाऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे. इराण- अमेरिकेमधला अण्वस्त्रावरुन वाढता तणाव, व्हेनेझुएलातील अंतर्गत समस्या आणि मागणीत झालेली वाढ आदि कारणे भारतात इंधन दरवाढीस असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यात पेट्रोल ९ रुपये प्रति लिटरने व डिझेल ३.५० रुपये प्रति लिटरने स्वस्त आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा अधिभार कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.