मुंबई – इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दरकपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग आणण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकार रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र युवक काँग्रेसतर्फे आज 11 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी बुधवारी ही माहिती दिली. इंधन दरवाढी संदर्भात अंतरराष्ट्रीय दरातील वाढीचा भारतीय जनता पार्टीकडून दिला जाणारा संदर्भ धादांत खोटा आहे. प्रत्यक्षात काँग्रेस सरकारच्या काळात क्रूड ऑईलचा अंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर १०३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला होता. २०१० ते २०१४ या काळात तो ९५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत स्थिर होता. आज हाच दर ४२ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला आहे. याचा सरळ अर्थ अंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर निम्म्याने घटले आहे. असे असतानाही सरकार सर्वसामन्यांची घोर फसवणूक करत आहे, असा आरोप तांबे यांनी केला.
हे देखील वाचा
प्रत्यक्षात पेट्रोल, डिझेल उत्पादक व प्रक्रिया कंपन्या आपला नफा राखून ज्या किमतीत पेट्रोल-डिझेल तयार करतात, त्यावर 50 टक्क्यांहून अधिक उपकर केंद्र व राज्याकडून लावले जात आहेत. त्यामुळे ४० ते ४५ रूपये प्रति लिटर दराने मिळू शकणारे पेट्रोल-डिझेल आज शंभरी गाठत आहे. केंद्र व राज्यांनी अनेक छुपे उपकर पेट्रोल व डिझेलवर लावले आहेत. 2013 च्या दुष्काळाचा सेस, दारू दुकाने सुरू झाली तरी त्यातून मिळणाऱ्या सरकारी उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी घेण्यात येणारा सेस, 2001-2002 मध्ये बांधलेल्या रस्त्यांचा सेस असे अनेक अनावश्यक उपकर पेट्रोल व डिझेलवर लावलेले आहेत, असेही ते म्हणाले.
पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर स्थिर ठेवण्यासाठी इंधन जीएसटीमध्ये सामाविष्ठ करावे आणि इंधनावरील अनावश्यक उपकर रद्द केल्याचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करावे या प्रमुख मागण्यांसाठी प्रदेश युवक काँग्रेस राज्यभर आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून गुरूवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सरकारच्या निष्क्रीय कारभाराचा जाहीर निषेध करणार आहे. कॉंग्रेसची सत्ता असताना इंधन दरवाढीसंदर्भात केलेल्या भाषणांच्या सीडी आणि त्यासंदर्भातील स्मरणपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठवून ‘क्या हुआ तेरा वादा? असा प्रश्नही काँग्रेस कार्यकर्ते विचारणार आहेत, असे तांबे यांनी सांगितले.