इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन

0

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पिंपरी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरुवारी पिंपरीत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्षा प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका निकिता कदम, संगीता ताम्हाणे, गीता मंचरकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, नगरसेवक राजू काटे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, पुष्पा शेळके, पौर्णिमा पालेकर, पल्लवी पांढरे, मनीषा गटकळ , मीरा कुदळे, रूपाली गायकवाड, कविता खराडे, लता ओव्हाळ, संगीता कोकणे आदी सहभागी झाले होते.

‘सरकारच्या अच्छे दिनाचे हार्दिक स्वागत’, ‘पेट्रोल 85, डिझेल 71 पार’, ‘पेट्रोल आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘पेट्रोल, डिझेल दरवाढ करणार्‍या सरकारचा निषेध असो’, ‘ना तेरी है न मेरी है ये सरकार लुटेरी है’, ‘मोदी सरकार हाय हाय’, अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज भडकत आहेत. या वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, इंधन दर शंभरीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 84.99 रुपये पेट्रोल आहे. महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.