इंधन दरवाढी कॉग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध

0

जळगाव । मोदी सरकारच्या काळात गेल्या 72 दिवसात पेट्रोलच्या दरात 16 रुपयांची तर डिझेलच्या दरात 4 रुपयांनी वाढ केली आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत रोज वाढ होत असून ही दरवाढ छुपी आहे. शासनाच्या इंधन दरवाढीचा भुर्दंड सामान्य नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढीचा कॉग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात येत असून दरवाढी विरोधात कॉग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी 18 रोजी निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कॉग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेवर रॉकेल ओतून होम हवन केले व मोदींना श्रध्दांजली अर्पण करत आत्मशांतीसाठी प्रार्थना केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवास उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
जिल्हाधिकारी नसल्याने निवेदन देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांच्या दालनात गेले असता त्याठिकाणी मुंडके उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला आंदोलनकर्त्यांनी घेराव घातला. भ्रमणध्वनीवरुन मुंडके यांना कळविण्यात आल्यानंतर ते कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, प्रदेश चिटणीस डी.जी.पटील, महानगराध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, तालुकाध्यक्ष संजय वर्‍हाडे, देवेंद्र मराठे, रमेश शिंपी, अशफाक काझी, जफरुल्ला जमादार, विजय महाजन, अ‍ॅड.अविनाश भालेराव यांच्यासह कॉग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने आणले बुरे दिन
पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने दर वाढ होत आहे. केंद्र शासनाने इंधनाचे दर कमी करण्याचे आश्‍वासन देत सत्ता संपादन केले आहे. मात्र इंधन दरवाढ कमी न करता उलट वाढविण्यात आल्याचे दिसून येते. भाजपाने सत्तेत येण्यासाठी अच्छे दिनचे स्वप्न दाखविले मात्र प्रत्यक्षात बुरे दिन आल्याचे आरोप कॉग्रेसने केले आहे. इंधनावर 40 टक्के टॅक्स लावून मोदींनी 30 टक्के आणि फडणवीस यांनी 10 टक्के रक्कम लाटल्याचे आरोपही यावेळी कॉग्रेसतर्फे करण्यात आले.