पुणे-गेल्या १० दिवसांपासून इंधनदरात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसकडून ‘स्कूटर ढकल’ हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते हातात स्कूटर घेऊन ती ढकलत नेत सरकारविरोधी घोषणा देत होते.
केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार आल्यापासून जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरले आहे. त्यात प्रामुख्याने मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. याचा विचार हे सरकार करताना दिसत नसून केवळ हे सरकार केवळ उद्योगपतींचे आहे, असा आरोप शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केला. तसेच केंद्र सरकारने दरवाढ मागे न घेतल्यास काँग्रेसकडून आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला. या आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, अभय छाजेड तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.