नवी दिल्ली । विमान अपघातातून केंद्रीय नगर विकास मंत्री वैंकय्या नायडू थोडक्यात बचावले आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि वैंकय्या नायडू यांना घेऊन जाणार्या खासगी विमानात काल बिघाड झाला. दोन्ही नेत्यांना इंफाळकडे घेऊन जाणार्या या विमानाची फेरी रद्द करावी लागली. हे दोघे नेते एन. बीरेन सिंग यांच्या शपथविधीत सहभागी होण्यासाठी ते इंफाळला जात होते. उड्डाण करताच 40 मिनिटांमध्ये हे विमान पुन्हा दिल्लीत परतले. वैंकय्या नायडू मागील 14 वर्षांत नऊ वेळा हवाई अपघातातून बचावले आहेत. विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या घटना घडल्या. एअर डेक्कनच्या उद्घाटनावेळी विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. तेव्हापासून नायडू आणि विमान अपघाताचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर अनेकदा हेलिकॉप्टरमधून जात असताना नायडू थोडक्यात बचावले आहेत. या घटना नागालँड, मेघालय, झारखंड आणि राजस्थानच्या सिरोही येथे घडल्या आहेत.