इच्छादेवी चौफुलीजवळ दगडफेक

0

व्यापारी संकुलामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त: बाजारपेठ सुरळीत सुरू

जळगाव: सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.दरम्यान, सकाळी शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ दुकानावर किरकोळ दगडफेक झाली.त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला जळगाव शहरातील काही संघटनांनी पाठिंबा दर्शविला. त्यानुसार कार्यकर्त्यांनी सकाळी बंदचे आवाहन केले.मात्र काही वेळ व्यापार्‍यांनी बंद ठेवून पून्हा दुकाने सुरु केलीत.त्यामुळे बाजारपेठ सुरळीत सुरु होती. मात्र इच्छादेवी चौफुलीजवळ दुकानावर किरकोळ दगडफेक झाल्याने दुकानाच्या काचा फुटल्या.त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. बहुजन क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात आल्यानंतर पदाधिकार्‍यांचे भाषणे झाल्यानंतर डीवायएसपी डॉ.निलाभ रोहन यांनी मोर्चाची परवानगी नाकारली.तसेच शांततेचे आवाहन केले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

भारत बंदला जळगाव शहरात फारसे पडसाद उमटले नसले तरी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले,डीवायएसपी डॉ.निलाभ रोहन यांनी काही संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन शांतता राखण्याचे आवाहन केले.