इच्छाशक्तीला सत्यात उतरविल्यास अशक्य काही नाही

0

जळगाव । आजकालची माणस अपयशामुळे लगेच खचतात आणि हताश, नाराजी आणि निराशेचा सूर लावतात. परंतु आयुष्यात अपयशाची कारणे न भूणभूणता यशप्राप्तीच्या प्रयत्नाची गीते गुणगुणावी लागतात. असाध्य ते साध्य करता येते परंतु त्यासाठीच्या इच्छाशक्तीला सत्यात उतरविले पाहिजे. चुका ह्या होणारच परंतु त्यातून बोध घ्यावा, कारण चुकतो तोच माणूस चुकत नाही ती यंत्रे, मशीन चुकले तर ते सरळ बंद पडते असे प्रतिपादन पत्रकार मयूर भावे यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयातील मुलांचे वसतिगृह आणि एम.जे. कॉलेज संचलित मुलींचे (शहर) वसतिगृह यांच्या वतीने आयोजित एम.जे.होस्टेल व्याख्यानमाले प्रसंगी ते बोलत होते. सदर व्याख्यानमालेत आपले प्रेरणादायी विचार मांडतांना मयूर भावे पुढे म्हणाला की आजकाल माणसे स्वत:शी प्रामाणिक नाहीत, जगाचे सोडा. त्यामुळे आत्मविश्वासाचा दुष्काळ जाणवतो आहे.

ते छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये स्वत:ला अडकवून उद्याच्या मोठ्या कामासाठी असलेल्या शक्तीला नष्ट करतांना दिसतात असे नमुद केले. या व्याख्यानमालेची सुरुवात शहर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी गायलेल्या ‘इतनी शक्ती हमे देना दाता ..’ या प्रेरण गीताने झाली. विद्यार्थी चंद्रकांत इंगळे याने सूत्रसंचालन केले, गोपाळ बागुल याने वक्त्यांचा परिचय करून दिला तर अश्विन सुरवाडे याने आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी श्री.चंद्रकांत भंडारी, प्रा. प्रसाद देसाई अन्य प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.