इच्छुकांना लागले विधानसभेचे डोहाळे!

0

एरंडोल(रतीलाल पाटील)। विधानसभा निवडणुकीस दोन वर्षे अवधी असतांना मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना आतापासूनच निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. त्याबाबत या मतदारसंघात चर्चा रंगू लागल्या आहेत. काही उमेदवारांना मतदारसंघातील कुठल्याच समस्यांचा थांगपत्ता नसतांना त्यांच्याकडून उमेदवारीचा मोठा गाजावाजा केला जात आहे. या गोंधळात राजकारणाची व्याख्याच बदलतांना दिसून येत आहे. सुधारणांसाठी समाजकारणाच्या मार्गाने राजकारण ही व्याख्या बदलून पैसा हेच राजकारण, अशी संकल्पना तयार होत आहे. कार्यकर्त्याची पक्षासाठी मेहनत व पक्षनिष्ठा कितीही मोठी असू द्या, पण पैसा तुमच्याकडे नसला तर पक्षासाठी तुमचे कितीही मोठे योगदान असले तरी तुम्ही कार्यकर्ता म्हणूनच राहतात.

पारोळ्यातील लोक मतलबी?
येत्या विधानसभा निवडणुकीत एरंडोल मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढण्याचे चित्र असून स्थानिक उमेदवारांमध्ये मात्र निराशा आहे. गेल्या निवडणुकीत स्थानिक उमेदवारांना तालुक्यातून भरभरून मते मिळूनसुद्धा पराभवास सामोरे जावे लागले कारण त्यांना पारोळा तालुक्यातून नगण्य मते मिळाली. एरंडोल तालुक्यातील सर्वच पक्ष आपला उमेदवार पारोळ्याचा असो की, एरंडोलचा; या तालुक्यातून भरभरून मते पदरात पाडून घेतात परंतु पारोळा तालुक्यात एरंडोलच्या उमेदवाराच्याबाबत उलट घडते. एरंडोलच्या मतदारांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

भाजपमध्ये बंडखोरी अटळ
धरणगाव तालुका वेगळा झाल्यापासून एरंडोल मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने एरंडोल मतदारसंघात पारोळा तालुका व भडगाव तालुक्यातील काही भाग जोडला गेल्यामुळे आतापर्यंत पारोळा तालुक्यातीलच लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत.यामुळे एरंडोल तालुका दुर्लक्षित होत असल्याचे मतदारांचे मत आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार जवळपास निश्‍चित असल्यामुळे अन्य इच्छुकांमध्ये नाराजी आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असल्यामुळे भाजपातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. नाराज उमेदवारांकडून छुपी किंवा खुली बंडखोरी होण्याचे चित्र आहे.

लोकप्रतिनिधीं कडून दुजाभाव
एरंडोल तालुका लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षित असल्याचे मतदारांचे सर्वसाधारण मत आहे. पारोळ्यातील लोकप्रतिनिधी तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पारोळा कार्यालयात थांबतात त्यांचे निकटवर्तीय नागरिकांच्या समस्या जाणून घेतात परंतु एरंडोल तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी कार्यालयात नसतात. लोकप्रतिनिधी तालुक्यात फक्त कार्यक्रमास हजार असतात त्यामुळे एरंडोल तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.