भुसावळ। अतिवेगवान रेल्वेसाठी तशा क्षमेतेच्या पटर्यांची आवश्यकता असते. भारतीय रेल्वेत मालवाहू गाड्या आणि प्रवासी गाड्यांसाठी एकच मार्ग आहे. त्यामुळे मालवाहू गाड्यांसाठी वेगळ्या मार्गाची व्यवस्था झाल्यास इटलीप्रमाणे भारतातही अतिवेगवान रेल्वे गाड्या सुरु करणे शक्य असल्याची माहिती भुसावळ विभागाचे मंडळ रेल्वे प्रबंधक राम कुमार यादव यांनी दिली. इटलीतिल नामांकित व्यवस्थापन विद्यालयातून घेतलेल्या प्रशिक्षणाचा वापर भारतीय रेल्वेच्या प्रगतीसाठी करणार आहे तेथील प्रवासी सुविधा आणि रेल्वे तंत्रज्ञान आपल्या पेक्षा उच्च दर्जाचे आहे असे यादव यांनी सांगितले. याप्रसंगी एडीआरएम अरुण धार्मिक, सिनीअर डिसीएम सुनिल मिश्रा, जीवन चौधरी, प्रदीप साळुंके आदी उपस्थित होते. भुसावळ विभागातून 30 जणांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात आली होती. मिलानो स्थित जागतिक दर्जाच्या बकोनी मॅनेजमेंट स्कुल मध्ये 2 आठवड्याचे प्रशिक्षण या रेल्वे अधिकार्यांच्या चमुला देण्यात आले असल्याचे डिआरएम यादव यांनी या वेळी सांगितले.
नॅरोगेज रेल्वे चालविणे तोट्याचे काम
इटलीमधील हायस्पीड रेल्वे हि केवळ 8 डब्यांची असून त्यात इंजिन बदलाची सुविधा देखील अतिशय सोयीस्कर आहे. त्यामुळे इंजिन बदलासाठी लागणार वेळ यात वाचतो. या गाड्यांना कमीत कमी दहा स्थानकांवर थांबे असतात. याची तुलना केली असता सध्या आपल्याकडे स्थानिक भागासाठी नॅरोगेज रेल्वे सुविधा आहे. मात्र हि सुविधा तोट्यात जात असून यासंदर्भात राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला असता त्याला मंजूरी मिळाली असून यात अर्धा हिस्सा हा राज्य सरकारने देण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचेही डिआरएम यादव यांनी स्पष्ट केले.
विमानापेक्षा रेल्वेला प्राधान्य
इटली रेल्वेने त्यांच्या आर्थिक राजधानी मिलान ते राजधानी रोम पर्यंत हायस्पीड मार्गिका तयार केल्यामुळे तेथील नागरिकांनी विमान प्रवासाऐवजी रेल्वे प्रवासावर भर दिला. 700 किमीचे अंतर केवळ 3 तासांवर आल्याने दोन्ही शहरांमधील प्रवासी रेल्वेने प्रवास करायला लागले. आपल्या सारखीच तेथील रेल्वे 4 ते 5 वर्षांपूर्वी चालत होती मात्र त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तसेच मालवाहतूक व्यवस्था मार्ग वेगळा केला.त्यामुळे तेथील गाड्या 300 किमी प्रतितास वेगाने धावतात. आपल्याकडे अशाच स्वरूपाची व्यवस्था निर्माण करण्यावर भर असून डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुरू झाल्यावर प्रवासी गाड्यांच्या गतीत वाढ करणे शक्य आहे.
मोफत सुविधेला दिला फाटा
इटलीमधील रेल्वे स्थानकावर स्वच्छता वाखाळण्याजोगी आहे. याचे कारण म्हणजे येथील प्रवाशांची मानसिकता आणि विशेष म्हणजे त्याठिकाणी कुठल्याही प्रकारची मोफत सुविधा दिली जात नाही. याठिकाणी मुतार्यांचा वापर केला असता 70 रुपये आकारले जातात. त्यामुळेच प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होत असते. प्रत्येक गाड्या वेळेवर धावत असून 10 मिनीटे अगोदर गाडीची सुचना दिली जाते. तेव्हाच प्रवाशांना आत फलाटावर सोडण्यात येते. याअगोदर कुणालाही आत सोडण्यात येत नाही. मात्र आपल्याकडे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हि व्यवस्था करणे अडचणीचे असल्याचे यादव म्हणाले.
भारतीय रेल्वेचा प्रवास होणार अधिक सुखकर
भारतात हाय स्पीड रेल्वे चालविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजना तयार केल्या असून मुंबई-नागपूर तसेच मुंबई-अहमदाबाद या मार्गावर हाय स्पीड रेल्वे चालविली जाणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनातर्फे नियोजन केले जात असून कामकाजाला गती मिळाली आहे. इटली येथे झालेल्या अभ्यास दौर्यात देशभरातील रेल्वे विभागातील अनेक अधिकारी सहभागी झाले होते. येथील रेल्वे व्यवस्थापन तसेच वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा भारतीय रेल्वेला होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही डीआरएम यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच देशभरात मॉडेल स्टेशन उभारणीच्या कामालाही गती दिली जात असून स्थानकांवर प्रवाशांना सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
भारतात रेल्वेचे भाडे कमी
भारतीय रेल्वेवर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यावर भर देणार असून त्याचा फायदा आपल्या प्रवाशांना होणार आहे. दोन्ही रेल्वे मधील फरक स्पष्ट करतांना यादव म्हणाले की तेथे प्रवासी सुविधा आपल्यापेक्षा कमी आहेत.त्यांच्या तुलनेत आपली प्रवासी सुविधा चांगली असून त्यात तंत्रज्ञानाचा वापर करुन अजून उत्तम बनविण्याचे नियोजन रेल्वे करीत असते. आपल्याकडे मालवाहतूक व प्रवासी रेल्वे मार्गिका वेगळ्या झाल्यावर प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग 200 किमी प्रति तास होऊ शकते. इटलीच्या तुलनेने आपल्या रेल्वेचे भाडे कमी आहे. प्रशिक्षणादरम्यान रेल्वेच्या आधुनिक कार्याची माहिती करून देण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले. प्रसंगी अप्पर मंडळ प्रबंधक अरुण धार्मिक व वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा आदी उपस्थित होते.