इटारसी पॅसेंजरमध्ये 68 हजाराची चोरी

0

भुसावळ। रेल्वेने प्रवास करीत असताना प्रवाशाच्या झोपेचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बँग लंपास करुन 4 हजाराच्या रोख रक्कमेसह 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना इटारसी – भुसावळ पॅसेंजरमध्ये शुक्रवार 7 रोजी दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रेल्वेत वाढत्या चोर्‍या लक्षात घेता प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे दिसून येते.

खंडवा येथे गुन्हा वर्ग
नवी दिल्ली येथील प्रवासी शिरीष भिडे हे इटारसी-भुसावळ पॅसेंजर पॅसेंजरने प्रवास करीत असताना आपली बॅग बर्थखाली ठेवली होती. त्यांना झोप लागली असता चोरट्यांनी याचा गैरफायदा घेत भिडे यांची बॅग लंपास केली. गाडी खंडवा रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर त्यांना बॅग चोरीस गेली असल्याचे समजले. बॅगेत 4 हजार 500 रुपये रोख, पॅन कार्ड, आधार कार्ड, एटीएम, अपंग प्रमाणपत्र, पुखराज, नीलम, पन्ना, मोती असे रत्न व कपडे असा एकूण 68 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याबाबत शिरीष भिडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा खंडवा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. दरम्यान रेल्वेतील वाढते गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे.