कॅलिफोर्निया । भारतीय खेळाडूंंनी अमेरिकन ओपन बॅडमिंटन कमाल केली आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत भारताचे खेळाडू आमनेसामने असणार आहेत. सुमारे 12 हजार डॉलर्स पुरस्काराची रक्कम असलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना भारताच्या पारुपली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांच्यात रंगेल. ऑक्टोबर 2015 मध्ये, दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडणार्या कश्यपने सुमारे 21 महिन्यांच्या कालावधीनंतर एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. दुखापतींनी त्रस्त असलेल्या प्रणॉयने गेल्यावर्षी स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत प्रणॉयने व्हिएतनामच्या तिएन मिन्ह न्गुयेनचा 21-14, 21-19 असा सरळ पराभव केला. दुसर्या लढतीत बिगर मानांकित कश्यपने कोरियाच्या क्वांग ही हेओची लढत 15-21, 21-15, 21-16 अशी मोडून काढली.
कश्यप, प्रणॉय हे याआधी दोन वेळा ऐकमेकांविरुद्ध खेळलेले आहेत. त्यापैकी दोघांनीही प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. 2014 मधील जर्मन ओपन स्पर्धेतील दुसर्या फेरीतल्या सामन्यानंतर ते पहिल्यांदाच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. दुहेरीच्या लढतीत भारतीय जोडीला अपयशाचा सामना करावा लागला. 2015 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार्या मनु अत्री आणि बी. सुमित रेड्डीला उपांत्य फेरीत अव्वल मानांकन मिळालेल्या चायनिज तैपईच्या चिंग याओ आणि यांग पो हॅन या जोडीने 12-21, 21-12, 22-20 असे हरवले.