इतक्या पुरस्कारात ‘आई’मुळे मिळणारा पुरस्कार अनमोल

0

‘श्याम’ पुरस्कार स्विकारताना उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांची भावना

पिंपरी-चिंचवड : ‘आजपर्यंत मला राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याहस्ते पुरस्कार मिळाले. मात्र आईमुळे मिळणारा हा पहिलाच पुरस्कार असल्यामुळे या पुरस्काराचे महत्व माझ्यासाठी वेगळे आहे. हा पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत’, अशी भावना उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्या वतीने ज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांना ‘श्याम’ व त्यांच्या आई सुमन शांताराम भोंडवे यांना ‘श्यामची आई’ पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते मनोगतात बोलत होते.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, आदर्श गाव प्रकल्प योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार, तसेच स्वागताध्यक्ष सुरेश शिरुडे, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. श्यामची आई पुस्तक व गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

राष्ट्रपतील, पंतप्रधानांच्या हस्तेही गौरव
संकेत भोंडवे म्हणाले, ‘सानेगुरुजी यांनी लिहिलेले ’श्यामची आई’ हे मातृप्रेमावर आधारित पुस्तक आहे. त्या नावाने मिळणारा हा पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. यापूर्वी मला राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, आईमुळे मिळणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व वेगळे आहे. मला आयुक्त व्हायचे होते, पण जिल्हाधिकारी झालो.’

मुलावरील संस्कार सार्थकी लागले
सुमन भोंडवे म्हणाल्या, ’श्यामची आई’ पुरस्कार जाहीर झाल्याने खूप आनंद झाला आहे. माझे पती शांताराम भोंडवे यांनी कलागुणांना दिलेले प्रोत्साहन आणि आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे माझी चांगली जडणघडण झाली. कोणत्याही कामाचा आळस न करता, ’नाही’ हा शब्द बाजूला ठेवून मी सतत प्रयत्न करीत राहिले. हा पुरस्कार जाहीर झाल्याने मुलांवर केलेले संस्कार सार्थकी लागले असे वाटते. प्रत्येक घरात ’श्यामची आई’ असते आणि ती ’श्याम’ घडवू शकते. मात्र, त्यासाठी प्रत्येक घरातील ’श्याम’ने ’श्यामच्या आई’चे ऐकले पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट, जिद्द, आत्मविश्‍वास आणि आई-वडील व गुरुजनांचा आशीर्वाद महत्वाचे असतात. आजचा पुरस्कार खर्‍या अर्थाने माझे पती कै. शांताराम भोंडवे यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली ठरेल

जिल्हाधिकारी कार्यालयात झिरो पेंडन्सी
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, शासकीय कार्यालायातील कामाबाबत सर्वसामान्य माणूस कमालीचा उदासीन असतो. शासकीय कार्यालयात प्रलंबित फायलींचे गठ्टेच्या गठ्टे वर्षानुवर्षे पडून असल्याचे चित्र असते. पण हे सर्व चित्र बदलून स्वच्छ आणि गतिमान प्रशासन करावयाचे आहे. त्यासाठी झिरो पेंडन्सी मोहिम हाती घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काम वेगात सुरु आहे प्रशासनाकडे आलेला कागद यापुढे कोणाच्याही पाठपुराव्याशिवाय विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करुन स्वच्छ व तत्पर प्रशासन घडवू असा त्यांनी मंत्र दिला.

‘डीवाय’चा विद्याथी असल्याचा अभिमान
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, संकेत भोंडवे हा माझ्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याबद्दल खूप अभिमान आहे. एवढ्या लहान वयात एवढे पुरस्कार मिळाले. याबाबत कौतुक वाटते. यावेळी भाई वैद्य, दिलीप बंड, पोपटराव पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.