इतिहासाचे स्मरण आणि भविष्याकडे वाटचाल हे सूत्र अंगिकारून यश संपादन करावे

0

महापौर मुक्ता टिळक : 352 वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवासाठी पालखी प्रस्थान सोहळा

पुणे : ज्या काळात कोणत्याही व्यवस्था-सोयी नव्हत्या, त्याकाळात बुद्धीचातुर्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्य्राहून आपली सुटका करून घेतली. शत्रूच्या तावडीतून सुटका होणे किती अवघड आहे, हे आपल्याला पाकिस्तानात कैद असलेल्या आपल्या कुलभूषण जाधव यांच्या घटनेवरून दिसते. त्याकाळात शिवाजी महाराजांनी अचूक वेळ साधत औरंगजेबाच्या तावडीतून स्वत:ची व सहकार्‍यांची सुटका करून घेतली. त्यामुळे प्रत्येकाने इतिहासाचे स्मरण आणि भविष्याकडे वाटचाल हे सूत्र अंगिकारून यश संपादन करायला हवे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ यांच्या वतीने 352 वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये लाक्षणिक पालखी प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.सचिन जोशी, सुशीलाबाई वीरकर, मुख्याध्यापिका मंगला निफाडकर, उपायुक्त माधव जगताप, वसंतराव प्रसादे, अनिल मते, दीपक उपाध्ये, अनिल दातार, मंगेश राव, अमित भालेराव, राजगडाचे गडकरी सूर्यकांत भोसले, उदय जोशी उपस्थित होते. उत्सवाचे यंदा 38 वे वर्ष आहे.

उत्सवाला पालिका सहकार्य करेल

महापालिका हद्दीबाहेर जाऊन एखाद्या कार्यक्रमाकरीता निधी देणारी पुणे महापालिका ही आशिया खंडातील पहिली महापालिका आहे. शिवरायांनी जो पराक्रम गाजविला त्याला नमन करण्याकरीता आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त किल्ले राजगड उत्सवाचे सातत्याने आयोजन केले जात आहे. पुणे महापालिका याकरीता सहकार्य करीत आहेच. तसेच यापुढेही सहकार्य करेल, असे आश्‍वासन यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी दिले.

किल्ले राजगडावर गड जागरण

प्रसादे म्हणाले, शिवनेरी, रायगडवर ज्याप्रमाणे उत्सव साजरा होतो, त्याप्रमाणे स्वराज्याची 25 वर्षे राजधानी असलेल्या राजगडावर मात्र उत्सव होत नाही. त्यामुळे राजगडावरील उत्सवाची संकल्पना पुढे आली. तरुणांनी राष्ट्रभक्ती जागृती व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने 38 वर्षे हे काम करीत आहोत. जोशी म्हणाले, राजगडावरील सदर पूर्णत्वास नेणे आणि उत्सवास सहकार्य करण्याचे श्रेय पुणे महापालिकेला जाते. दरवर्षीप्रमाणे दि. 15 व 16 डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे गड जागरण, ढोल-ताशा वादन, भारूड, सुर्योदयास ध्वजारोहण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.