लंडन । कपिल देव निखंजच्या भारतीय संघाने 1983 मध्ये विश्वचषक स्पर्धेत विंडीजला नमवून लॉर्डस्वर एक इतिहास रचला होता. असाच इतिहास पुन्हा रचण्याची संधी भारतीय क्रिकेट संघाला मिळाली आहे. संघ भारतीयच आहे फक्त त्यातील चेहरे बदलले आहेत. त्यावेळी पुरुष संघ होता यावेळी महिला संघ आहे. साखळी लढतीतील इंग्लडवर मिळवलेल्या विजयाची पुनरावृत्ती झाल्यास भारतीय संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याबरोबर क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या लॉर्ड्सवर पुरुषांप्रमाणे महिला विश्वचषक जिंकणारा क्रिकेट जगतातला पहिला संघ ठरेल. दक्शिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता या स्पर्धेत भारताने स्वप्नवत कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी जे परिश्रम भारतीय संघाने घेतले आहेत त्यांचे फळ त्यांना मिळावे अशी आशा भारतीय संघाला असेल. गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करत संघाने स्वत:ची वेगळी वाट तयार केली आहे. भारताने या स्पर्धेच्या अभियानाला सुरुवात करतान पहिल्याच लढतीत इंग्लडला 35 धावांनी हरवले होते. उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. कर्णधार मितालीने अंतिम सामन्याच्याआधी इंग्लडला सावधही केले आहे. पण त्याचवेळी इंग्लडने पहिल्या सामन्यातील पराभवानंतर स्पर्धेत जोरदार मुसंडी मारत गुणतालिकेत आघाडी मिळवली होती. याशिवाय विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड चौथ्यांदा विजेतेपदापासून एक पायरी दूर आहे. त्यामुळे भारताला सावध राहूनच मैदानात उतरावे लागेल.
तुल्यबळ लढतीची अपेक्षा
भारताने साखळी स्पर्धेत हरवल्यावर इंग्लंडने नंतर मात्र दमदार वाटचाल केली आहे. त्यामुळे साखळी लढतीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय संघाला जोर लावावा लागेल. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि मितालीने स्पर्धेत चांगली फलंदाजी केली आहे. अंतिम सामन्यातही त्यांना तसाच खेळ करावा लागेल.
गोलंदाजीत दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली होती. अंतिम सामन्यातले यशापयश या तिघींवर बरेचसे अवलंबून आहे. दुसरीकडे इंग्लंडन आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. यष्टिरक्षक आणि फलंदाज सारा टेलर आणि नताली शिवारीकडून संघाच्या अपेक्शा असतील. कर्णधार हिथर नाईटच्या मते संघाने अजून सर्वोत्तम कामगिरी केलेली नाही. अतिम सामन्यात ती होऊ शकते.
मिताली, झुलनसाठी खास अंतिम सामना
भारत याआधी 2005 मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरला होता. विद्यमान संघातील कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामीचा त्या उपविजयी संघात समावेश होता. या दोघींची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असू शकते. त्यामुळे मागील वेळी हुकलेली संधी यावेळी न गमावता स्पर्धेचा विजयी निरोप घेण्याचा या दोघींचा इरादा असेल. झुलन आणि माझ्यासाठी हा अंतिम सामना विशेष असल्याचे मितालीने सांगितले आहे.
…तर हा खास विक्रम होईल
भारतीय संघाने इंग्लडला हरवून विश्वचषक जिंकल्यास, एकाच देशाच्या पुरुष आणि महिला संघाने लॉर्ड्स मैदानावर विश्वचषक स्पर्धा जिंकणारा भारत पहिला देश ठरेल. लॉर्ड्सवर विंडीजने दोनदा विश्वचषक जिंकला, त्यांचा महिला संघ विजयी झालेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने आतापर्यंत पाच वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्यात एकदा ते लॉर्डसवर विजेते ठरले होते. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी सहा वेळा ही स्पर्धा जिंकलेली असली तरी लॉर्ड्सवर मात्र त्यांची पाटी कोरी आहे.
अंतिम सामन्यासाठी उभय संघ (सामन्याची वेळ : दुपारी 3 वाजल्यापासून)
भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, झूलन गोस्वामी, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, एकता बिष्ट, सुषमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, नुजहत परवीन, स्मृती मंधाना
इंग्लंड: हिथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कॅथरीन ब्रंट, जॉर्जिया एल्वीस, जेनी गुन, अॅलेक्स हर्टले, हेजेल डॅनियल, बेथ लँगस्टन, लारा मार्श, आन्या श्रुबशोल, नताली शिवर, सारा टेलर, फ्रेन विल्सन, वॅट डॅनियल, विनफिल्ड लॉरेन.