अलिबाग। इतिहासाच्या पाऊलखुणा जपायला हव्यात, अशी फक्त चर्चा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात या पाऊलखुणा जपण्याकडे सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष होते. अलिबागजवळील चोंढी येथील बामणसुरे गावात असाच एक प्राचीन शिलालेख असाच उपेक्षित आहे. मराठीतील पहिला शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्या आक्षी येथील शिलालेखात व या शिलालेखात बरेच साम्य आहे.त्यामुळे या शिलालेखाचा अभ्यास केल्यास मराठी भाषेच्या इतिहासावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. या शिलालेखाकडे सरकार, पुरातत्त्व विभाग व इतिहास अभ्यासकांचेही दुर्लक्ष झाले आहे. केवळ महाराष्ट्र गॅझेट या पुस्तकात नोंद करण्यापलीकडे शिलालेखाच्या जपुणुकीसाठी तसेच अभ्यासासाठी कोणतीही पाऊले उचलली गेलेली नाहीत.
बामणसुरे या गावात मुंगी पैठणी या देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेर हा शिलालेख आहे. तो रस्त्याच्या कडेला आहे. गावकरी या शिलालेखाला देवीचा पहारेकरी म्हणून ओळखतात. काहींच्या मते हा शिलालेख देवीच्या घोड्याचा आहे. त्यामुळे त्याला गावकर्यांनी रंग फासला. आता त्याची पूजा केली जाते. रंगरंगोटीमुळे शिलालेखावरील मजकूर वाचणे कठीण झाले आहे.
अभ्यास गरजेचा
आक्षी येथील शिलालेख मराठीतला पहिला शिलालेख म्हणून ओळखला जातो. आक्षी यथील शिलालेख एक हजार वर्षांहून अधिक जुना आहे. बामणसुरे या गावातील शिलालेखही 900 ते हजार वर्ष वर्षांपूर्वीचा असावा, असा अंदाज इतिहार अभ्यासर वर्तवित आहेत. या शिलालेखाचा अभ्यास व संवर्धन करण्यासाठी सरकारच्या इतिहास संशोधन विभागाने पुढाकार घेण्याची मागणीही इतिहास संशोधक करत आहेत. तसेच या शिलालेखाचा अभ्यास केल्यास मराठी भाषेच्या जडणघडणीवर आणखी प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
आक्षी व बामणसुरे शिलालेखामधील साम्य
1 मराठीतील पहिला शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेखात व बामणसुरेयेथीलशिलालेखात बरेचशे साम्य आहे. आक्षी येथील शिलालेखात नऊ ओळींचा मजकूर आहे. या शिलालेखामध्ये पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराय यांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून, महालक्ष्मी देवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे आहे.
2 आक्षी शिलालेखावर ओणवी स्त्री व तिच्यावर आरूढ गाढवाचे चित्र आहे. हे चित्र म्हणजे शापवाणी आहे. बामणसुरे येथील शिलालेखावरही ओणवी स्त्री व गाढवाचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. आक्षी शिलालेखाप्रमाणे हा शिलालेखही देवीच्या मंदिर परिसरात आहे.
आक्षी येथील शिलालेखाप्रमाणे बामणसुरे येथेही मंदिराजवळ शिलालेख आहे. या शिलालेखांचे जतन करणे गरजेचे आहे. या शिलालेखाचा अभ्यासही व्हायला पाहिजे. सद्यस्थितीत या शिलालेखाची दुरवस्था झाली असून, त्यावरील मजकूर नष्ट होत चालला आहे. तो कायमचा नष्ट झाल्यास या शिलालेखाला काही अर्थ उरणार नाही.
प्रा. जयेश म्हात्रे, इतिहास अभ्यासक