इतिहासातून प्रेरणा घेण्याची गरज

0

भुसावळ । शिवाजी महाराज हे व्यवस्थापन गुरु होते. अतिशय चांगले वास्तुविशारद होते. अतिशय दुर्गम आणि भक्कम भू दुर्ग आणि जलदुर्ग याची आपणास साक्ष देतात. नंतरच्या काळात बांधलेले पूल पडत आहेत परंतु शिवकालीन पूल अजूनही भक्कम आहेत. त्यामुळे अशा महापुरुषांच्या इतिहासातून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता अभय हरणे यांनी सांगितले. दीपनगर विद्युत केंद्रात शिवजयंती सप्ताह राबविण्यात येत आहे.

विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग
वसाहतीमधील मुला मुलींसाठी निबंध, सामान्यज्ञान, चित्रकला आणि स्मरणशक्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. लेखक- दिग्दर्शक महेंद्र चव्हाण यांचे ‘खुडू नको कळी गं आई’ हे सामाजिक नाटक वसाहतीमधील बाल कलाकारांनी सदर केले. वसाहतीमधील नवीन क्रीडा संकुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

बाल व्याख्याते जाधव यांनी मांडले शिवरायांचे चरित्र
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उप मुख्य अभियंता माधव कोठुळे आणि नितीन गगे तर वक्ता म्हणून 12 वर्षीय बाल व्याख्याते राजाराम चिमणाजी जाधव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अक्षद पवार या छोट्या बाल कलाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा दमदारपणे सादर केला. 12 वर्षीय बाल व्याख्याते राजाराम जाधव याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील उदाहरणे सांगितली. जगातील पहिली शिव जयंती साजरी करणारे महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी कार्याची शिवजयंती सोबत सांगड घातली. आम्हाला शाळेत खोटा इतिहास शिकविला जातो. खरे नायक अजूनही पडद्यामागे दडवून ठेवण्यात आलेले आहेत. खरा इतिहास समोर आणणे अतिशय आवश्यक आहे. असे विचार आपल्या बाल परंतु उच्च आवाजात त्याने मांडून सर्वांची वाहवा मिळविली.

सुत्रसंचलन कल्याण अधिकारी तथा समिती कार्याध्यक्ष पंकज सनेर यांनी केले तर आभार समिती सचिव अतुल कदम यांनी मानले. यावेळी अधिक्षक अभियंता एम.पी. मसराम, राजेश राजगडकर, विजय बारंगे, एम.बी. पेटकर, एम.बी. अहिरकर, सी.एन. निमजे, एन.आर. देशमुख, जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार आदी उपस्थित होते. समिती कोषाध्यक्ष सागर थोरात, समिती सदस्य आर.पी. निकम, रामकृष्ण कारंडे, नारायण सोनवणे, अरुण शिंदे, विकास पाटील, राजेश पवार, वाय.जी. सिरसाठ, अनिकेत सोळसकर, भरत पाटील, अनिल वानखेडे, संजय देसाई, प्रदीप शेलार यांनी परिश्रम घेतले.