अभिषेक गवळी: आज कोरोनाने 195 देशांपैकी 152 देशांमध्ये प्रवेश केला आहे. जवळजवळ 75% जग कोरोनाने व्यापले आहे. अजून तरी यावर कोणतेही औषध निर्माण झाले नसून, मृत्यूचे प्रमाण पण दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्व परिस्थितीमुळे आठवण होत आहे ती स्पॅनिश फ्लूची. अमेरिकेमध्ये 1918 साली मार्च महिन्यात ‘स्पॅनिश फ्लू’चे पहिले काही रुग्ण आढळले होते. प्रथमतः रुग्ण जरी अमेरिकेत आढळले असले तरी त्याची सुरवात फ्रान्समधील ब्रिटिश लष्कराच्या छावणीमध्ये झाली, असे काहींचे मत आहे. हा आजार पसरण्यास पहिल्या महायुद्धाच्या काळात सुरुवात झाली पण दुसर्या महायुद्धाच्या काळात जागतिक घडामोडी वेगाने घडत गेल्याने स्पॅनिश फ्लूने जग व्यापले. त्या काळी असणार्या एकूण लोकसंख्येपैकी एक टक्का लोकसंख्या स्पॅनिश फ्लूने मृत्युमुखी पडली.
स्पॅनिश फ्लूनंतर 1957 मध्ये एच 2 एन 2 हा व्हायरस पूर्व आशियामध्ये वेगाने पसरला. म्हणून हा व्हायरस (विषाणू) एशियन फ्लू या नावाने ओळखला जात आहे. याचा पहिला रुग्ण सिंगापूरमध्ये आढळला होता. तेथून वेगाने जगभर पसरण्यास सुरुवात झाली. यामुळे एकूण 12 ते 15 लाख मृत्युमुखी पावले होते. यातून जग सवरतेय तेवढ्यात 1968 मध्ये एच 3 एन 2 हा नवीन व्हायरस आला. याचा संसर्ग 10 लाख लोकांना झाला होता. काही वर्षांनी या व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्याने 2011 मध्ये पुन्हा डोके वर काढले होते. त्यावेळी जगभरात 330 लोकांना लागण झाली होती त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. सर्वांना परिचित असणारा एच 5 एन 1 म्हणजेच बर्ड फ्लू. याचा उगम 1997 मध्ये हाँगकाँग देशात एक शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये झाला होता. एकूण 50 देशांमध्ये बर्ड फ्लूचा वेगाने फैलाव झाला. यामध्ये प्रामुख्याने आफ्रिका, मध्य पूर्व अशिया, युरोप हे खंड होते. हा व्हायरस प्रामुख्याने कोंबड्यांमध्ये पसरत होता. पण 2004 व 2014 साली मानवामध्येदेखील याची लागण झाली होती. याचा पहिला संसर्ग झालेला व्यक्ती कॅनडामध्ये सापडला होता. तो व्यक्ती चीनमधून आला होता. प्रत्येक व्हायरसचा संबंध कोणत्यातरी कारणास्तव चीन देशाशी येतोच. यातून आज जगभर खूप सार्या शंका जगभर उपस्थित केल्या जातात. पण चिनी महासत्तेविरूद्ध कोणीही कृती करायला तयार होत नाही. अमेरिकेने कोरोनासंदर्भात आणीबाणी जाहीर करताना हा फॉरेन व्हायरस आहे, अशी अप्रत्यक्ष टीका चीनवर केली. चीनने यास प्रत्युत्तर देताना अमेरिकेच्या सैनिकांनी चीनच्या वुहान शहरात आणून सोडलेला हा व्हायरस आहे, असे म्हटले. अमेरिका व चीनच्या व्यापारयुद्धाचे अपत्य कोरोना व्हायरस असू शकते, असे इतर देशांना वाटते. ते काहीही असो पण या सर्वातून मात्र जगाचा विनाश जवळ येताना दिसत आहे.