इतिहास सांगायला तुम्ही जीवंत राहणार नाही!

0

पुणे : सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली की लोकमान्य टिळक यांनी, या वादाने आता गंभीर वळण घेतले आहे. कारण, हा वाद सुरु असतानाच भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाला धमकीचे पत्र मिळाले आहे. भाऊसाहेब रंगारी यांचा इतिहास सांगण्यासाठी तुम्ही जीवंत राहणार नाहीत, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. हे पत्र कोणी पाठवले हे अद्याप समजू शकले नसून, ट्रस्टच्यावतीने तक्रार दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, हा वाद आता उच्च न्यायालयात पोचला असून, या संदर्भात भाऊसाहेब रंगारी मंडळाकडून सोमवारी उशिरा याचिका दाखल करण्यात आली. या वादावर समिती नेमण्याची मागणी करण्यात आली असून, या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

सशस्त्रक्रांती वीस दिवसांत दाखवू
भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाला पाठवण्यात आलेल्या धमकी पत्रात अतिशय आक्षेपार्ह आणि खालच्या स्तराची भाषा वापरण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे, की तुम्ही ज्या मागण्या करत आहात त्या फालतू आहेत. कोण भाऊ रंगारी? त्याला कोणी ओळखत नाही. इतिहासाची पुनरमांडणी नाही, तुमच्या घरच्यांना आता तुमची पुनरमांडणी करावी लागेल. तुमचे कपडे काढून तुमची धींड काढली पाहिजे. नाक तर ठेचले आहे आता तुम्हाला ठेचण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या सीमा पार केल्या आहेत. तुमचे कुठलेही पुरावे आम्हाला अमान्य आहेत. उपोषण केले तर भुकेनेच मेला तर बरे होईल. नाहीतर आम्ही बघू. तसेच फालतू गोष्टीमध्ये पडू नका नाही तर सशस्त्रक्रांती काय असते ते तुम्हाला येत्या वीस दिवसांत दाखवू, अशा आशयाचे धमकीचे पत्र मंडळाला मिळाले आहे.

आता शांत बसणार नाही
या संदर्भात मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले, अशा प्रकारचे धमकीचे पत्र मागील वर्षीदेखील आले होते. हे दुसरे धमकीचे पत्र मंडळास मिळाले आहे. प्रत्येक वर्षी असे पत्र येत असल्याने आता आम्ही शांत बसणार नाही. या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत.