इथे महाराष्ट्रातील विधवांच्याही जुळताहेत रेशीम गाठी!

0

मुंबई।  कमी वयातच अनेक स्त्रिया विधवा होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे महिलांना एकटे आयुष्य काढणे कठीण झाले आहे. यासाठी विधवांचे पुनर्विवाह करून पुनर्वसन करण्याचे कार्य सुरू आहे. या कामामुळे गेल्या पाच- सहा वर्षांत पुनर्विवाह होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले असून, विविध संस्थांमार्फत विधवांच्या आयुष्यातदेखील नवीन आशेचा किरण फुलला आहे. विशेष म्हणजे या महिलांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.

ऋणानुबंध पुस्तिका व व्हॉट्सअ‍ॅप मधून जुळतात ‘रेशीमगाठी’
ज्याप्रमाणे उपवर- वधूंसाठी प्रत्येक समाजातर्फे वधू- वर परिचय मेळाव्याची पुस्तिका काढली जाते, त्याचप्रमाणे विधवा महिलांसाठीदेखील पुस्तिका काढण्यात येत आहे. शहरातील लोकांची मानसिक बदलली असून, आजकाल पती अथवा पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर ते पुनर्विवाह करण्यास तयार असतात. त्यामुळे ऋणानुबंध पुस्तिका व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातूनदेखील विधवांच्या ‘रेशीमगाठी’ जुळताना दिसून येत आहे.

विधवांकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलावा
आजही ग्रामीण भागात व काही समाजांत पुरुषांचा विधवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट आहे. तो बदलायला हवा. बदलत्या परिस्थितीनुसार कुटुंबासाठी विधवा महिलांना नोकरीसाठी बाहेर पडावे लागतेच. तसेच कमी वयातच विधवा झाल्या असल्यास अनेकदा सासरची मंडळी विधवेचा पुनर्विवाह करीत असतात. मात्र, ग्रामीण भागातील लोकांना हे मान्य नसते.

ही समाधानाची बाब आहे. महिलांमध्ये बदलत्या काळानुसार जनजागृती करण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून आता महिला स्वतःहून पुनर्विवाहास तयार होत आहेत. यामुळे अनेक नवीन कुटुंबे उभी राहतील.
अ‍ॅड. आशा लांडगे, सदस्य राज्य महिला आयोग

पुरूष महिलांच्या चारित्र्यावर नेहमी बोलत असतात. त्यामुळे विधवा महिलांच्या बाबतीत ग्रामीण भागतील पुरुषांची मानसिकता बदलण्याची सर्वाधिक गरज आहे. सकारात्मक दृष्टीकोन हवा आहे.
उषा रामलू, सामाजिक कार्यकर्त्या