भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजन
भोसरी : इनर व्हील क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 33 वी आराधना बैठक भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी क्लबच्या अध्यक्षा डॉ. सावित्री रघुपती, सचिव अनुराधा चांडक, समन्वयक मंजू शर्मा, प्रतिभा कुलकर्णी, स्मिता पिंगळे, मनीषा समर्थ, सुप्रभा अलोनी, रेणू गुप्ता, सुनीता कुलकर्णी, संगीता देशपांडे, वैशाली शहा, डॉ. चारुलता चिंचणकार, रोशन चिंधी, अमृता गुलाठी, अनुराधा सूड, हंसा मोहन, बेला अगरवाल, विनिता अरोरा, नितू रोशन, स्मिता टिळेकर, स्नेहा रणदिवे यांची उपस्थिती होती. तसेच बैठकीसाठी महाराष्ट्राच्या सर्व विभागांमधून आलेले क्लब सदस्यदेखील उपस्थित होते.
‘झेप’च्या विद्यार्थ्यांचे कौतुक
नाट्यगृहाच्या सभागृहात इनरव्हील क्लबच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणार्या 12 संस्थांचे स्टॉल लावण्यात आले. विशेष मुलांसाठी काम करणार्या चिंचवड येथील झेप पुनर्वसन संस्थेच्या 95 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गृहसजावटीच्या आकर्षक वस्तू सभागृहात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. या माध्यमातून संस्थेला आर्थिक मदत तर झालीच शिवाय विशेष मुलांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. याप्रसंगी झेप संस्थेच्या विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत
त्याचबरोबर अन्य 11 संस्थांनीदेखील स्वत: तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. ज्या संस्थांना वस्तू विक्रीसाठी प्रवेशमूल्य भरणे शक्य नाही, अशा सात संस्थांना इनरव्हील क्लबतर्फे मोफत स्टॉल लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमात उपस्थितांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून लोककलांचा मनमुराद आस्वाद घेतला.