पोलिस ठाण्याला व्हेंडिंग मशीनची भेट
निगडी : पोलिसांची कर्मचार्यांची ड्यूटी जास्त वेळ असते. महिला कर्मचार्यांनाही वेळीअवेळी या महिलांना ड्यूटीवर उभे रहावे लागत असते. त्यामुळे महिला कर्मचार्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. मासिक पाळीमध्ये या महिलांच्या कष्टामध्ये वाढ होते. त्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्त इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्यावतीने येथील पोलिस ठाण्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर बसविण्यात आले आहे. या उपक्रमामुळे पोलिस ठाण्यात काम करणार्या महिला पोलिस कर्मचारी, बंदोबस्तासाठी येणार्या महिला कर्मचारी तसेच तक्रारी व अन्य कामानिमित्त येणार्या सर्व महिलांना याचा लाभ होणार आहे.
महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले, निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर, माजी अध्यक्ष साधना काळभोर, प्रणिता अलुरकर, शकुंतला बन्सल, सभासद सुजाता ढमाले, डॉ. रंजना कदम, माधुरी भुरकुले, नियोजित अध्यक्ष प्रतिभा दलाल, राजश्री, विजय काळभोर, रवी राजापूरकर, स्मिता इलावे, निगडी ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.
विविध त्रासापासून मुक्ती
महिला कर्मचार्यांची होणारी आबाळ लक्षात घेता त्यांच्यासाठी या मशिन्सची सोय करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनमधून नवीन सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत. तर इन्सिनरेटर या मशीनमध्ये वापरलेले नॅपकिन जमा करता येणार आहेत. या दोन्ही मशिन्समुळे महिलांच्या अडचणी बर्याच प्रमाणात कमी होणार आहेत. यामुळे सॅनिटरी नॅपकिन रस्त्यावर, कचराकुंड्यांमध्ये उघड्यावर टाकल्याने उद्भवणार्या विविध त्रासांपासून सुटका मिळणार आहे. इन्सिनरेटरद्वारे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यात येते. या उपक्रमामुळे महिला पोलिस कर्मचारी व उपस्थित महिलांच्या चेहर्यावर भावनिक आनंद दिसून आला.
महिलांना लाभ होईल
याबाबत कार्यक्रमाबाब बोलताना इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापूरकर म्हणाल्या की, सर्वच महिलांना सॅनिटरी नॅपकिन मिळणे ही काळाची गरज आहे. शहर शांत राहण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेकदा पोलिस कर्मचार्यांना सतत कर्तव्यावर रहावे लागते. महिला पोलीस कर्मचारी देखील यामध्ये मागे नाहीत. मात्र सॅनिटरी नॅपकिन सारख्या काही गोष्टींमुळे त्यांची वाताहत होऊ नये, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा फायदा महिला पोलीस कर्मचारी व अन्य महिला लाभ घेतीलच. महिला कर्मचारी यांनी आपले आरोग्य टिकवून ठेवावे यासाठी या मशिन्स फायदा करून घ्यावा.
महिलांना नक्कीच फायदा होणार
निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले म्हणाले की, अशा प्रकारचा उपक्रम परिसरात प्रथमच सुरु करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनची सर्वत्र उपलब्धता ही काळाची गरज आहे. ही गरज सर्वांनी ओळखून अशा स्तुत्य उपक्रमांना चालना द्यायला हवी. पोलिस ठाण्यात सतत महिलांचा वावर असतो. हा उपक्रम पोलिस ठाण्यात सुरु केल्याने गरजू महिलांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.