इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द

0

पुणे । पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रुकसाना इनामदार यांचे नगरसेवक पद गुरुवारी रद्द करण्यात आले. इनामदार यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेला इतर मागासवर्गीय जातीचा दाखला अवैध ठरल्याने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी ही कारवाई केली.

रामटेकडी-वैदूवाडी-सय्यदनगर प्रभाग क्रमांक 24 मधून त्या निवडून आल्या होत्या. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ’मच्छिमार दालदी’ या इतर मागासवर्गीय जातीच्या दाखल्यावर सारिका शिंदे, तानाजी लाकडे आणि उषा लाकडे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानुसार इनामदार यांच्याविरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. समितीने केलेल्या तपासणीत हा दाखला अवैध आढळून आला. जात पडताळणी समितीच्या निर्णयानुसार पालिका प्रशासनाने इनामदार यांचे पद रिक्त कारण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्यावर आयुक्तांनी गुरुवारी स्वाक्षरी करत इनामदार यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गेल्या पाच महिन्यात जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे किशोर धनकवडे आणि भाजप-रिपाइंच्या फर्जाना शेख यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे.