नवी दिल्ली : परदेशात दडलेले काळे धन आणि बेहिशेबी मालमत्ता यांबाबत माहिती देणाऱ्या खबऱ्याला चक्क एक ते पाच कोटींच्या बक्षिसाचे आमिष प्राप्तिकर विभागाने ठेवले आहे. त्यामुळे पुढील काळात प्राप्तिकर विभाग मोठ्या कारवायांमध्ये व्यग्र होण्याची शक्यता आहे. ‘खबरे व्हा आणि कोटय़वधी रुपयांचे बक्षीस मिळवा’, अशी योजना प्राप्तिकर विभागाने आखली आहे. यानुसार बेनामी व्यवहार अथवा मालमत्तेबद्दल प्राप्तिकर विभागाला विशिष्ट माहिती दिल्यास खबऱ्याला एक कोटी रुपये बक्षीस मिळू शकते. त्याचप्रमाणे परदेशातील ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांबाबतची माहिती दिल्यास पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळू शकते.
योजना आखली
प्राप्तिकर खबऱ्या पारितोषिक योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. प्राप्तिकरात अथवा भारतातील मालमत्तेसंदर्भात मोठय़ा प्रमाणावर कर चुकविण्यात आल्याची माहिती दिल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५० लाख रुपयांचे इनाम मिळू शकते. बेनामी व्यवहारांची माहिती देण्यास जनतेला उद्युक्त करण्याच्या उद्देशाने ही पारितोषिक योजना आखण्यात आली आहे.
बेनामी व्यवहार अथवा मालमत्ता त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या मालमत्तांमधून गुप्त गुंतवणूकदारांनी आणि लाभार्थी मालकांनी मिळविलेला पैसा याबाबत माहिती देण्यास उद्युक्त करण्यासाठी ही योजना आहे, असे सीबीडीटीने म्हटले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शुक्रवारी बेनामी व्यवहार खबऱ्या पारितोषिक योजना २०१८ची घोषणा केली. परदेशी नागरिकासह कोणताही नागरिक बेहिशेबी मालमत्तेची आणि व्यवहाराची माहिती संयुक्त अथवा सहआयुक्तांना देऊ शकतो. त्याबाबत बेनामी व्यवहार (प्रतिबंधक) कायदा २०१६ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. खबऱ्याबाबतची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन प्राप्तिकर विभागाने दिले आहे. सर्व प्रकारच्या पारितोषिक योजनांसाठी ही गोपनीयता लागू आहे, कोणत्याही स्थितीत खबऱ्याची माहिती उघड केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.