थेरगाव : इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून विमा पॉलिसीच्या मिळणार्या रकमेवर सूट मिळविण्यासाठी पॉलिसी धारकाकडून 91 हजार 631 रुपये ऑनलाईन घेत पैसे पॉलिसीसाठी न भरता त्यांची फसवणूक केल्याची घटना गणेशनगर थेरगाव येथे उघडकीस आली. माल्याद्री मालाकोंडाय्या पल्लाला (वय 45, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मनीषकुमार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
विमा पॉलिसीत सुट देण्याचे सांगून अपहार…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माल्याद्री यांची एका विमा कंपनीत पॉलिसी आहे. 28 नोव्हेंबर रोजी आरोपी मनीषकुमार याचा फिर्यादीस फोन आला. त्याने मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. माल्याद्री यांनी पॉलिसीची रक्कम 23 डिसेंबर पूर्वी भरली तर त्यांना ठराविक रकमेची सूट मिळणार आहे, असे सांगत त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना स्वतःचा बँक खाते क्रमांक पाठवून त्यावर फिर्यादी यांना 91 हजार 631 रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपीच्या खात्यावर पैसे भरले. मात्र आरोपीने ते पैसे पॉलिसीसाठी न भरता त्याचा अपहार केला. यावरून फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.