हिंजवडी : उंच इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ताथवडे येथील सेंटोसा पर्ल सोसायटीत घडली. चेतल हेमकर्ण पाटील (वय 25, रा. ताथवडे) असे आत्महत्या करणार्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, चेतल पाटील या उच्चशिक्षित होत्या. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेप्रकरणी हिंजवडी पोलीस प्राथमिक नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे ताथवडे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुरक्षारक्षकाकडून मिळवली चावी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतल पाटील यांनी फ्लॅटमधील केबल नेटवर्कला काही तरी समस्या आहे, असे कारण सांगून सोसायटीतील सुरक्षारक्षकाकडून टेरेसची चावी घेतली. चावी घेऊन त्या टेरेसवर गेल्या. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज झाला. त्यामुळे सोसायटीतील इतर सदस्य बाहेर आले. त्यावेळी चेतल पाटील जखमी अवस्थेत जमिनीवर विव्हळत पडल्या होत्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी वाकड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
पाच महिन्यांपूर्वीच झाले लग्न
चेतल पाटील या उच्चशिक्षित होत्या. पाच महिन्यांपूर्वीच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा आयटी अभियंता असलेल्या हेमकर्णशी विवाह झाला होता. मंगळवारी दुपारी चेतल आणि त्यांची सासू या दोघीच घरात होत्या. पाटील कुटुंब मूळचे नगर जिल्ह्यातील आहे. पुढील तपासाकामी पोलिसांनी सदनिका सील केली आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.