जळगाव । जयकिसनवाडीतील नवजीवन मंगल कार्यालयासमोरील जुन्या लाकडी इमारतीला सोमवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागली. यात चार घरे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नव्हती. या घटनास्थळाची मंगळवारी दुपारी शहर पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी त्यांनी घरमालकांना कागदपत्रे सादर करण्याचे सांगितले. या आगीत 40 लाखांचे नुकसान झाले आहे.
कागदपत्रे सादर करण्याची सूचना
जयकिसनवाडीतील नवजीवन मंगल कार्यालयासमोरील लाकडी इमारतीत सहा घरे आहेत. त्यातील विनायक रामदास दिक्षीत यांच्या मालकीचे तळ मजल्यावर अरूण प्रल्हाद कस्तुरे यांचे गॅरेजचे साहित्य ठेवलेले आहे. त्या ठिकाणी आग लागून संपूण इमारतीत आग पसरली होती. बाजुला आनंद बन्सीलाल राणा यांच्या मालकीच्या घराचेही नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशीष रोही यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळाची पहाणी करून पंचनामा केला. तसेच या इमारतीतील घर मालकांना कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. कागदपत्रे दिल्यानंतर चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एपीआय रोही यांनी दिली
आकस्मात आगीची नोंद…
जयकिसन वाडीतील आगीच्या संदर्भात पंकज अरूण कस्तुरे आणि विनायक रामदास दिक्षीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तर दोघांनी प्रत्येकी 20 लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.