ठाणे । ठाणे पाचपाखाडी येथील एक जुनी हाऊसिंग सोसायटी असलेल्या वर्षा सोसायटीच्या गैरकारभाराची चौकशी करण्याचे आदेश उपनिबंधकांनी दिले असून, त्याची चौकशी सुरू झाली आहे. सर्वसाधारण सभेच्या कुठल्याही पूर्वपरवानगीशिवाय एक लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा असतानाही ठाण्यातील वर्षा हाऊसिंग सोसायटीच्या विद्यमान व्यवस्थापकीय समितीने तब्बल 46 लाख 95 हजार रुपये इतकी रक्कम इमारत दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. वर्षा सोसायटीच्या काही सदस्यांनी यासंदर्भात गडकरी रंगायतन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोसायटीच्या गैरकारभारावर प्रकाश टाकला. शासनाच्या सहकारी संस्था विभागाच्या, ठाणे शहर भागाच्या, उपनिबंधकांनी कलम 83 अंतर्गत ठाणे पश्चिम भागातील वर्षा हाऊसिंग सोसायटीला सदर आर्थिक व्यवहारप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, अॅडव्होकेट विलास गांगण यांची चौकशी अधिकारी म्हणून याच आदेशाद्वारे नेमणूकही केली आहे. चौकशी अधिकार्यांनी 3 महिने मुदतीत चौकशी पूर्ण करून आपला चौकशी अहवाल शिफारसींसह सादर करायचा आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पाचपाखाडी भागात असलेली वर्षा सोसायटी 60 हजार चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेली असून, येथे वन व टूबीएचके असे 106 फ्लॅट आहेत. ही 40 वर्षे जुनी सोसायटी असून 2014 पासून इमारत पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, सोसायटीत पुनर्बांधणीवरून गट पडले असून, सर्व सभासदांना विश्वासात न घेता, पूर्ण माहिती न देता परस्पर निर्णय घेऊन दुसर्याच विकासकाला काम देण्याचा घाट सोसायटीच्या विद्यमान कार्यकारिणीने घातला असल्याचा आरोप वर्षा सोसायटीचे सदस्य योगेश करंदीकर, नितीन ठाकूर, प्रसाद ताम्हणकर, विनय पाठक, उमेश जोशी आदींनी केला. इमारत दुरुस्तीसाठी संबंधित कंत्राटदारांना व अन्य व्यावसायिकांना कामाचे कंत्राट देताना नियमानुसार आवश्यक अशी निविदा प्रक्रियाच समितीने राबवली नसल्याचेदेखील उघड झाले आहे.
27 सदस्यांविरुद्ध पोलीस तक्रार
वर्षा सोसायटीची विद्यमान व्यवस्थापकीय समिती ही सन 2015 मध्ये अस्तित्वात आली. जयंत जोशी हे वर्षा हाऊसिंग सोसायटीच्या विद्यमान व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष असून सचिवपदी. दिलीप कुलकर्णी, तर खजिनदार म्हणून. संजय गुप्ते काम पाहत आहेत. सदर आर्थिक व्यवहारप्रकरणी शासनाच्या सहकारी संस्था विभागाच्या, ठाणे शहर भागाच्या, उपनिबंधकांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये दरम्यान सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीचेही सदस्य नसलेल्या वर्षा सोसायटीच्या 27 सदस्यांनी सोसायटीचे अधिकृत लेटरहेड वापरून पत्रव्यवहार केल्याप्रकरणी संस्थेच्या जागरूक सदस्यांनी नौपाडा पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.