मुंबई : घाटकोपरमधील एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळील साईदर्शन नावाची चार मजली इमारत मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. इमारतीच्या ढिगार्याखालून नऊ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. ढिगार्याखालून सुखरुप बाहेर काढलेल्या नागरिकांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
ही इमारत 30 वर्षे जुनी होती. इथे राहणार्या 12 कुटुंबावर काळाने घाला घातला. इमारतीच्या ढिगार्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. अग्निशमन दल, मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि स्थानिकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. याशिवाय 8 अॅम्ब्युलन्स घटनस्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. इमारतीच्या विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयेही काढली होती. या इमारतीला तडे गेले होते. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमचे रिनोव्हेशन सुरु होते. त्यामुळे हॉस्पिटल रिकामे होते. परंतु वरच्या मजल्यांवर लोक राहत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
दोषींवर कारवाई करणार
साईदर्शन इमारत अनधिकृत नव्हती. चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिले आहे. तसेच या विभागात अनेक इमारतींना ओसी नाही. महापालिकेने त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घाटकोपरमधील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी धोकादायक इमारतीला कुठलीही नोटीस दिली नसल्याचे महापौर महाडेश्वर म्हणाले. शिवाय, दोषींवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.