इम्रान खाननी त्यांच्या देशाशी संबंधित मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत करावं – नसिरुद्दीन शहा

0

मुंबई : भारतात अल्पसंख्याकांना समान वागणूक मिळणार नाही, हे त्याकाळात जिना बोलायचे. ते आज भारतात घडत असून आज नसिरुद्दीन शहा तेच बोलत आहेत, असं विधान करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, असं सांगतानाच इम्रान यांनी त्यांच्या देशाशी संबंधित मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत करावं, असा सल्लाही शहा यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिला आहे.

नसिरुद्दीन शहा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाना साधला आहे. ‘खान यांनी केवळ त्यांच्या देशाशी संबंधित मुद्द्यांवरच बोलावं. ज्या गोष्टींशी घेणंदेणं नाही, त्यात पडू नये. आम्ही गेल्या ७० वर्षांपासून लोकशाही देशात राहत असून आमची काळजी कशी घ्यावी हे आम्ही जाणून आहोत,’ असंही शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी माणसाच्या मृत्यू ऐवजी गायीच्या मृत्यूला आपल्या देशात अधिक महत्त्व आल्याची चिंता व्यक्त करत मला माझ्या मुलांची चिंता वाटतेय, असं विधान केलं होतं. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच इम्रान खान यांनीही या वादात उडी घेतली होती.