इयत्ता १० वीचा उद्या निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इयत्ता १० वीच्या निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. यासाठी १० जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर आज राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार उद्या दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीनं इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.