इराणने अमेरिकेच्या लष्करी तळावर डागली १२ क्षेपणास्त्रे

0

बगदाद: अमेरिकेने गेल्या शुक्रवारी बगदाद येथील विमान तळाच्या बाहेर हल्ला करत इराणचे कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या बदल्यात आज इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत.

अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इराण विरुद्ध अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने इराकमधील अमेरिकी दूतावास तसेच हवाईतळाला लक्ष्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेच्या मालकीच्या हवाईतळावर मोठा हल्ला इराणने चढवला आहे.

इराणच्या ‘इस्लामिक रीव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी) फौजांनी अल असद हवाईतळावर १० क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इराणच्या सरकारी वाहिनीने दिले आहे. अशाप्रकारचे आणखी हल्लेही केले जातील, असा इशाराही आयआरजीसीने अमेरिकेला दिला आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी कोणत्याही शेजारी देशाने अमेरिकी फौजांना भूमी उपलब्ध करून दिल्यास त्या देशालाही लक्ष्य करण्यात येईल, असा इशाराही आयआरजीसीने दिला आहे.