इराणी चषकात गुजरातची मजबूत आघाडी

0

मुंबई : इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात दमदार कामगिरी करणाऱ्या गुजरातचा डाव दुसऱ्या डावात मात्र गडगडला. तरीही पहिल्या डावातील दमदार आघाडीच्या बळावर गुजरातने मजबूत ३५९ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाखेर गुजरातच्या दुसऱ्या डावात ८ बाद २२७ धावा झाल्या आहेत. पहिल्या डावात शानदार शतक ठोकणारा चिराग ५५ धावांवर खेळत आहे. गुजरातच्या पहिल्या डावातील ३५८ धावांच्या प्रत्युत्तरात शेष भारतचा डाव २२६ धावांवर आटोपला. गुजरातकडून चिंतन गाजाने ४, हार्दिक पटेलने ३ तर मोहित थंदाणीने २ गडी बाद केले.

प्रियांक, चिरागच्या बळावर ३५९ धावांची लीड
दुसऱ्या डावात गुजरातच्या प्रियांक पांचाळ ७३ धावांची खेळी केली. तर कर्णधार पार्थिव पटेल ३२, ध्रुव रावल २३, मनप्रीत जुनेजा १३, करन पटेल १५ यांना मात्र मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या लयीत असलेले फलंदाज बाद ठरावीक फरकाने बाद झाल्यांनतर चिराग गांधीने दुसऱ्या डावातही नाबाद ५५ धावांची खेळी करून संघाला २०० चा आकडा पार करून दिला आहे. गुजरातचे अजून दोन गडी शिल्लक असून एकूण ४०० धावांचे लक्ष्य ठेवण्याची शक्यता आहे. शेष भारतकडून नदीमने शानदार गोलंदाजी करत ४ गडी बाद केले. त्याला मोहम्मद सिराजने २, पंकज सिंग आणि कौलने प्रत्येकी १-१ गडी बाद करत चांगली साथ दिली. रणजी जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या गुजरात संघाला विजयाची संधी आहे.