सध्या निवडणुकांचा आणि मोदी नावाच्या लाटेचा हंगाम आहे. निवडणुका पार पडल्या, निकाल लागला आणि जिकडे-तिकडे विजयोत्सव सुरू झाला. देशभरात राजकीय क्षेत्रात वेगवेगळी समीकरणे बदललेली दिसून आली. यामध्ये इंडियाच्या ‘सेव्हन सिस्टर’चा भाग असलेल्या मणिपूरमध्ये एक फार आश्चर्याची घटना घडली. इरोम शर्मिलाचा झालेला पराभव. पराभव हे आश्चर्य मुळीच नाही. मात्र, तिला मिळालेली 90 मतं हे मात्र निश्चितच आश्चर्य आहे. ते आश्चर्य केवळ तिला मतदान करणार्या 90 लोकांसाठी नव्हे तर जगभरातून तिच्या समर्थनार्थ उतरलेल्या लाखो लोकांसाठीसुद्धा असावं. इरोम शर्मिला (माहितेय का? नसेल तर गुगल करा). सिस्टमच्या विरोधात लढणारी अफाट व्यक्ती. सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफ्स्पा)च्या विरोधात 16 वर्षाच्या उपोषणात अख्खा देश सहानुभूतीपूर्वक तिच्यासाठी प्रार्थना करत असेल. जगातल्या अनेक लोकांनी तिची दखल घेतली. गांधीमार्गाने लढणारी ही लढवय्यी राजकारणात आली तर येण्याआधीच विरोध झाला होता. तिचा इथं टिकाव लागणे कठीणच होतं.
लोकशाही आहे. बीजेपीने आधीच्या लोकांपेक्षा काहीतरी चांगलं केलंय असं लोकांना वाटतं म्हणून इतक्या जबरदस्त पद्धतीने पक्षाने देशभरात बाजी मारली आहे. याआधी इंदिराजींच्या वेळी अगदी असंच लोकांना वाटत होतं. मात्र, नंतर लोकं कंटाळले. इंदिरा काँग्रेस प्रभाव टिकवू शकली नाही. बेक्कार हरले. सध्याचा काळ संक्रमनाचा आहे. लोकांना चांगलं वाटतंय. जे लोकं हे वाईट आहे असं म्हणताहेत त्यांच्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीयेत, हे स्पष्टय. ते त्यांचा चांगुलपणा जोरदार पद्धतीनं दाखवत आहेत. यावर विश्वास ठेवून बीजेपी हे यश मिळवतेय. याबद्दल बीजेपीच खरंच अभिनंदन करायला पाहिजेल. प्रभाव आणि पराभव स्वीकारणे गरजेचे आहे. तो स्वीकारून विरोधी पक्षांनी किंवा राजकारणात उतरून समाजकारण करू इच्छिणार्या इरोमसारख्या लोकांनी आत्मचिंतन करावे, हे निश्चित.
एक गोष्ट मात्र निश्चित झाली की समाजकारण, चळवळ, आंदोलन आणि राजकारण या प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या आहेत. समाजकारण, आंदोलनाचे स्वरूप बदलले मात्र राजकारण अजून तिथल्या तिथंच पडून असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. लोकांच्या हितासाठी चळवळ, आंदोलन करणार्या लोकांपेक्षा ज्यांना ‘राजकारण’ जमते किंवा कळते ते लोक या देशात महान किंवा लोकशाही चालवण्यासाठी योग्य आहेत असेच म्हणावे लागेल. इरोमकडे राज्याच्या विकासाचे कोणते संकल्पचित्र होते/आहे? हा प्रश्न राजकीयदृष्ट्या खरंच महत्त्वाचा आहे? तिने उपोषण केले म्हणजे लोकांनी तिला निवडूनच द्यायला हवे होते, हा निश्चितच आपला हट्ट आहे आणि असे आरोप देखील तिच्यावर केले जात आहेत. मात्र, आंदोलनातून आलेलं नेतृत्व याआधीही देशाने स्वीकारले आहे. अरविंद केजरीवाल याचं सक्षम उदाहरण आहे. इरोम देखील असं उदाहरण होऊ शकली असती. मात्र, सिस्टमच्या प्रभावाखाली न्याय्य मार्गाने 16 वर्ष जिंकू शकली नाही, तर इथं 16 महिन्यात थोडीच जिंकणार होती. ती अगदी बेक्कार हरली. लाखो लोकांसाठी लढणार्या इरोमला लोकशाहीच्या सिस्टममध्ये केवळ 90 मतं पडली. त्या 90 जणांना सलाम. तुम्ही कदाचित देशद्रोही ठरू शकता. इरोम तुझा पराभव हा फक्त तुझा पराभव नाहीये. कविता महाजन म्हणतात त्याप्रमाणे आपल्या देशात लोकांना ‘हुतात्मे’ अधिक आवडतात. शर्मिला उपोषणात मेली असती तर तिचे देशातच काय जगात पुतळे उभारले गेले असते. एवढंच काय आज गांधीजी असते तरी ते निवडणुकीत हरले असते, अशी स्थिती देशात आहे. का हरले असते? कसे हरले असते? या प्रश्नांवर आता आपणच अंतर्मुख होऊन विचार करू. काही लोकं इरोमवर टीका देखील करत आहेत. तिच्या राजकारणात येण्याला विरोध दर्शवत आहेत किंवा तिच्या पराभवाचं समर्थन करत आहेत. मात्र, हीच इरोम आपला स्वाभिमान बाजूला ठेवून बीजेपीसारख्या पक्षात जाऊन राजकारण खेळली असती तर आज कदाचित ती निश्चितपणे मुख्यमंत्रीपदाची उमेदवार राहिली असती आणि यावेळी सुद्धा तिच्यावर वेगळ्या बाजूने चर्चा झाल्या असत्या.
लोकांच्या हितासाठी चळवळ, आंदोलन करणार्या लोकांपेक्षा ज्यांना राजकारण जमते किंवा कळते ते लोक या देशात महान किंवा लोकशाही चालवण्यासाठी योग्य आहेत, असेच म्हणावे लागेल. इरोमकडे राज्याच्या विकासाचे कोणते संकल्पचित्र होते/आहे? हा प्रश्न राजकीयदृष्ट्या खरंच महत्त्वाचा आहे? आंदोलनातून आलेलं नेतृत्व याआधीही देशाने स्वीकारले आहे. अरविंद केजरीवाल याचं सक्षम उदाहरण आहे. इरोम देखील असं उदाहरण होऊ शकली असती. मात्र, सिस्टमच्या प्रभावाखाली न्याय्य मार्गाने 16 वर्ष जिंकू शकली नाही, तर इथं 16 महिन्यात थोडीच जिंकणार होती.
शेवटी इरोम आणि सशक्त लोकशाहीसाठी ’पाश’च्या या ओळी.
हम लड़ेंगे साथी, उदास मौसम के लिए
हम लडेंगे साथी, गुलाम इच्छाओं के लिए
हम चुनेंगे साथी, जिन्दगी के टुकडे
हथौडा अब भी चलता है, उदास निहाई पर
हल अब भी चलता हैं चीखती धरती पर
यह काम हमारा नहीं बनता है, प्रश्न नाचता है
प्रश्न के कन्धों पर चढकर
हम लडेंगे साथी
कत्ल हुए जज्बों की कसम खाकर
बुझी हुई नजरों की कसम खाकर
हाथों पर पडे घट्टों की कसम खाकर
हम लडेंगे साथी
निलेश झालटे – 9822721292