गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या फ्लोरिडा भागात इर्मा वादळाने घातलेल्या हैदोसात सेंट मार्टिन आयलंड हे बेट काही तासांत होत्याचे नव्हते झाले आहे. आठवडा लोटल्यानंतरही येथील नागरिकांना पुरेसे अन्नपाणी उपलब्ध होऊ शकलेले नाही. कारण रस्ते निकामी झाल्यामुळे अन्न पाणी पुरवण्यात अडथळे निर्माण झाले आहेतच, पण या बेटावरील घरे पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत. येथील सुपरमार्केट लुटली गेली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त बनले आहे.
लोक अजूनही आपले सामान शोधत आहेत. जेसीबीने येथील सफाई सुरू झाली असली तरी त्याला कांही दिवस लागणार आहेत. फूड मार्केट, घरे, रिसॉर्ट भुईसपाट झाल्याने नागरिकांना लष्कराच्या छावण्यातून आश्रय घ्यावा लागला आहे. जे अन्न पाकिटबंद होते त्यात किडे पडले आहेत. येथील लोकांसाठी पुरेसा अन्नपुरवठा होऊ शकलेला नाही हे लष्कराने मान्य केले आहे. मात्र जोपर्यंत सामान वाहून नेण्यासाठी रस्ते थोडेफार दुरूस्त होत नाहीत तो पर्यंत सर्व नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचविणे अशक्य असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. या बेटावर वादळकाळात ताशी २२५ मैल वेगाने वारे वाहात होते व त्यामुळे हे बेट उद्धस्त झाल्याचे सांगितले जात आहे.