पुणे । पुणे सातार रोडवर गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी नारायण टॉकीजसमोर आग लागून इलेक्ट्रिक वस्तू रिपेअरिंगच्या दोन टपर्या जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे अन्य इमारतीत आग पसरण्याचा धोका टळला. पुणे सातारा रोडवरील लक्ष्मी नारायण थिएटर समोर, साई बाबा मंदिर जवळ वाडकर बिल्डिंग शेजारी भरत राणा यांचे राणा इलेक्ट्रॉनिक्स शॉप नावाची रेडिओ व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करण्याची एक छोटी टपरी आहे. टपरीला रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे कारण मात्र समजले नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने आगीने अल्पावधीतच मोठा पेट घेतला. मोठ्या प्रमाणात आग लागलेली तेथील स्थानिक रहिवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. मात्र, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकून शेजारील दुसर्या टपरीलाही तिची झळ पोहोचली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी शेजारील इमारतीत आग लागण्याचा धोका पाहून जवानांनी त्या इमारतीतील नागरिकांना बाहेर काढले. त्यानंतर एक बंबाच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत दोन्हीही टप-या जळून खाक झाल्या. ही कामगिरी मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफिसर प्रकाश गोरे, फायरमन मोरे, राहुल माने, अतुल खोपडे, शेलार सोनावणे यांनी बजावली.