पुणे । जीएसटीमुळे व्यापार्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वस्तुवरील वेगवेगळे जीएसटीचे दर, त्याचे रेकॉर्ड कसे ठेवायचे या पेचात सध्या विक्रेते आहेत. परिणामी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवसाय तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी घटला आहे.
जीएसटीचे 0, 5, 12, 18 आणि 28 टक्के असे विविध कर आहेत. त्यामुळे प्रत्येक वस्तूंसाठी वेगळे बील कसे करणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 400 ते 500 प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाजारात उपलब्ध असतात. त्या प्रत्येकावर वेगळा जीएसटी आकारला आहे. ते कसे मेंटेन करणार? होम अप्लायंसेंसवर 13.50 टक्के कर होता. तो आता तब्बल 28 टक्के झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 25 टक्के कर होता तो 28 टक्के केला आहे. यामुळे व्यापार 25 ते 30 टक्क्यांनी घटला आहे.
व्यापारी पेचात
शासनाने दर महिन्यास तीन रिटर्न भरायचे असा नियम केला आहे. त्यामुळे फक्त रिटर्नच भरण्यात व्यापार्यांचा वेळ जाणार आहे. यातच वेळ वाया गेला तर व्यापार कसा करायचा, या पेचात सध्या व्यापारी आहेत. तसेच विविध टप्प्पयांवर जीएसटी क्रमांक घेण्याची सवलत दिली आहे. ती योग्य नाही. कारण ज्यांच्याकडे जीएसटी क्रमांक नाही त्यांच्याकडून माल खरेदी केला तर त्याला परतावा कसा मिळणार, असे प्रश्न व्यापार्यांपुढे उभे ठाकले आहेत.
ग्राहक झाले कमी
जीएसटीचा सर्वात मोठा फटका व्रिक्रेत्यांना बसला आहे. जीएसटीचे अकाऊंट मेंटेन करणे खूप अवघड काम आहे़ बाजारातील सर्वच दुकानदार संगणक साक्षर असतातच असे नाही. छोट्या दुकानदारांना खास अकाऊंट मेंटेन करण्यासाठी वेगळा माणूस नेमणे आर्थिकदृष्टया परवडत नाही. दुकानदारच जर शिक्षित नसेल तर ऑनलाईन काम कसे करणार, शासनाने या पर्यायातून काहीतरी मध्यम मार्ग काढावा. मिक्सर, टोस्टर, इस्त्री, ज्युसर, इलेक्ट्रीकल ओव्हन, फूड प्रोसेसर, फॅन, कुलर या वस्तुंच्या किंमती जीएसटीमुळे वाढल्या असल्याने 25 ते 30 टक्क्यांनी ग्राहक कमी झाले आहेत.
मीठालाल जैन,
अध्यक्ष, पूना इलेक्ट्रॉनिक्स हायर परचेस असोसिएशन
व्हॅटचा परतावा मिळणार का?
बहुतांश दुकानदारांकडे गेल्या वर्षी खरेदी केलेल्या वस्तुंचा साठा शिल्लक आहे. त्यांचा व्हॅटही भरला आहे. मात्र, सध्या जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे व्हॅटचा परतावा मिळणार का आणि मिळणार असेल तर तो किती टक्के मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.