इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन रद्द करुन बॅलेट पेपरची मागणी

0

चाळीसगाव । इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन रद्द करुन बॅलेट पेपरचा वापर करावा असे प्रतिपादन बामसेफचे हमीद शेख (भुसावळ) यांनी दि 26 एप्रिल रोजी चाळीसगाव येथे बहुजन क्रांती मोर्चा आयोजित संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चानंतर तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलतांना केले. बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समिती चाळीसगावच्या वतीने विविध मागण्यांसाठी 26 रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात लोकशाहीला घातक ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपर चा वापर करावा, शेतकर्‍याचे कर्ज, वीजबिल माफ होऊन शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अट्रासिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातांचा अपमान करणार्‍या पुरंदरेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा, मुस्लिम समाजाला सच्चर कमिशन लागू करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात यावे आदी प्रमुख 14 मागण्यांसाठी चाळीसगाव येथे बुधवारी सकाळी 11 वाजता रेल्वे स्थानकापासून बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता.

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मार्चाला सुरूवात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलतांना हमीद शेख म्हणाले कि मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नसून त्यांना आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आम्ही शासन दरबारी केली आहे. फडणवीस सरकारने ईव्हीएम मशीन मध्ये गरबड करून निवडणूक जिंकल्याचा आरोप त्यांनी केला. तर औरंगाबाद येथील प्रदीप तळेकर म्हणाले कि फडणवीस सरकारने बहुजनांमध्ये फूट पाडण्याचे काम केले त्यामुळे सध्याच्या निवडणुका बनावट घेतल्या गेल्या. ज्या देशांत ईव्हीएम मशीन बनवण्यात आले त्या देशात मशीन वापरले जात नाही परंतु भारतात याचा सर्रास वापर होत आहे हे मशीन बंद करण्यात यावे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक ऍड निलेश निकम तर बंजारा समाजाचे ओंकार जाधव यांनी शेतकऱयांना कर्ज माफी मिळावी, बाजार तांड्याना स्वतंत्र ग्रामपंचायत चा दर्जा मिळावा, ऊसतोड कामगारांसाठी महामंडळाची निर्मिती करावी अशी मागणी केली.

मान्यवरांकडून मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड.निलेश निकम यांनी केले. बहुजन क्रांती मोर्चाचे मुकेश नेरकर, प्रा.गौतम निकम, मोतीलाल अहिरे, ओंकार जाधव, कमल नेतकर, किर्ती इंगळे, अलका मोरे, अ‍ॅड.कविता मोरे उपस्थित होते. मुकेश नेतकर, वनेश खैरनार, महेंद्र सूर्यवंशी, किरण मोरे, बंटी पाटील, रायबा जाधव, अकील शेख, राष्ट्रवादीचे अमोल चौधरी, योगेश बाविस्कर यांच्या संयोजन समितीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास देवरे व पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत यांना देण्यात आले. यावेळी मोर्चा मध्ये बहुजन क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.