किंग्जस्टन । पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिजला 3-1 असे हरवणार्या भारतीय संघाला कॅरेबियन बेटांवरील एकमेव ट्वेन्टी 20 सामन्यात रविवारी यजमान संघाकडून लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. जमैकामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विंडीजने भारताचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला. विंडींजच्या इविन लिव्हीसने धुवाँधार फलंदाजी करताना नाबाद 125 धावांची खेळी केली. याशिवाय लिव्हीसने आंतरराष्टीय ट्वेन्टी 20 सामन्यातले दुसरे शतक पूर्ण करत संघाला 19 व्या षटकातच विजय मिळवून दिला.
विंडीजचा तिसरा विजय
आंतरराष्ट्री टी-20 क्रिकेट सामन्यातला विंडीजचा भारतावर मिळवलेला हा सलग तिसरा विजय आहे. भारताविरुद्ध खेळलेल्या सात टी-20 क्रिकेट सामन्यांमधील पाच सामने विंडीजने जिंकले आहेत. इविन लिव्हीस हा टी-20 क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा पहिला फलंदाज झाला आहे
स्वत:वर विश्वास होता
या सामन्यात इविन लिव्हीसला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. लिव्हीस म्हणाला की, हा चांगला सामना होता. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध शतक करणे ही मोठी बाब आहे. मागील सलग पाच सामन्यांमध्ये मोठी खेळी करता आली नव्हती. पण मला विश्वास होता. या सामन्यात तो विश्वास सार्थ ठरला.
लिव्हीसची वैयक्तिक कामगिरी
आव्हानाचा पाठलाग करताना आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात इविन लेव्हीसने केलेली नाबाद 125 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. याआधी हा विक्रम हाँगकॉगच्या बाबर हयातच्या नावावर होता. बाबरने 2016 मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत ओमान विरुद्ध 122 धावांचा विक्रम नोंदवला होता. टी-20 सामन्यात एकाच देशाविरुद्ध दोन शतके ठोकणारा लिव्हीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिलाच फलंदाज आहे. भारताविरुद्ध सर्वोत्तम फलंदाजी करणारा तो पहिलाच आहे.
लिव्हीसने केलेली नाबाद 125 धावांची खेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसर्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज एरॉन फिंच (156) आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 143) अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्या क्रमाकांवर आहे. लिव्हीसने या नाबाद शतकी खेळीत एकुण 12 षटकार ठोकले, ही सुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसर्या क्रमाकांची कामगिरी आहे. याआधी एरॉन फिंचने (14 षटकार) आणि द. आफ्रिकेचा फलंदाज रिचर्ड लेव्हीने (13 षटकार) ही कामगिरी केली होती