गांधीनगर-इशरत जहाँ चकमकप्रकरणी सीबीआयला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना अटक करायचे होते, असा खुलासा गुजरातचे माजी पोलीस महानिरीक्षक डी.जी.वंजारा यांनी एका विशेष न्यायालयात केला आहे. सीबीआयला मोदी आणि शाह यांना अटक करायची होती. पण असे होऊ शकले नाही, अशी माहिती वंजारा यांचे वकील व्ही.डी.गज्जर यांनी न्या.जे.के. पांड्या यांच्यासमोर हा दावा केला. मोदी हे आता देशाचे पंतप्रधान आहेत तर गृहराज्यमंत्री असतानाही न्यायालयाच्या आदेशामुळे आपल्याच राज्यात येण्यास चार वर्षांसाठी बंदीला सामोरे जावे लागलेले अमित शाह सध्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण तपास अधिकारी होतो. मोदी गोपनीयरित्या याप्रकरणी आपल्याकडे चौकशी करायचे, असे वंजारा यांनी यापूर्वी याच न्यायालयात सांगितले होते. वंजारा याप्रकरणी सध्या जामिनावर आहेत. सीबीआयने शाह यांना २०१४ मध्ये पुरेशा पुराव्याअभावी दोष मुक्त घोषित केले होते. जून २००४ मध्ये मुंबईतील इशरत जहाँ (वय १९), तिचा मित्र जावेद उर्फ प्राणेश आणि मूळ पाकिस्तानी जिशान जौहर आणि अमजद अली राणा यांना तत्कालीन पोलीस महानिरीक्षक वंजारांच्या पथकाने अहमदाबादनजीक चकमकीत ठार मारले होते.
इशरत आणि तिचे मित्र हे मोदी यांची हत्या करण्याच्या मोहिमेवर असलेले दहशतवादी होते, असा दावा त्यावेळी करण्यात आला होता. नंतर सीबीआयने आपल्या तपासात ही बनावट चकमक असल्याचा निष्कर्ष काढला होता. परंतु, वंजारांच्या वकिलांनी हे चुकीचे आरोपपत्र असल्याचा दावा करत या माजी अधिकाऱ्यांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे म्हटले. या प्रकरणातील साक्षीदार हे पूर्वी आरोपी असल्यामुळे त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, याचा पुनरूच्चार या वकिलांनी केला. सीबीआयने वंजारांच्या मुक्ततेला विरोध केला आहे. आणखी एक आरोपी आणि माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी एन.के. अमीन यांनीही याच न्यायालयात मुक्ततेसाठी याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी मागील महिन्यात संपली आहे. आपण तपासात सीबीआयला सहकार्य करत असल्याचा दावा अमीन यांनी केला आहे.