‘इसिए’तर्फे जलपुनर्भरणाबाबत जनजागृती

0

पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने (इसिए) शहरातील विविध शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करून पर्यावरण संवर्धनाचा जागर केला जात आहे. जलपुनर्भरण ही काळाची गरज असून, त्याच्या प्रसारासाठी समितीचे सदस्य व स्वयंसेवक प्रयत्न करत आहेत. मनपा शाळा दिघी, मनपा शाळा विकासनगर, मनपा शाळा किवळे आदी ठिकाणी जलपुनर्भरणाविषयी जनजागृती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन समितीने महापालिकेच्या 12 शाळांच्या इमारतींवर सुमारे 12 लाख रुपये खर्च करून जलपुनर्भरण प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी शाळांना भेटी द्याव्यात, तसेच आपल्या घराच्या छतावरही जलपुनर्भरण प्रकल्प उभारावा, असे आवाहन समितीने केले आहे.

यांची होती उपस्थिती
जलपुनर्भरणाविषयी माहिती देण्यासाठी पुण्यातील जलतज्ज्ञ कर्नल (निवृत्त) शशी दळवी यांच्यासह विकास पाटील, विनिता दाते, मुख्याध्यापिका संध्या गवळी, तुकाराम लांघी, संगीता पाटील, सरस्वती भेगडे, अविनाश वाळुंज, अनिल दिवाकर, गोविंद चितोडकर, गोरक्षनाथ सानप, अनघा दिवाकर, रंजना कुदळे, सुनीता जुन्नरकर, दत्तात्रेय कुमठेकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना सचित्र माहिती
प्रत्येक शाळेत जलपुनर्भरणाविषयी सचित्र माहिती देण्यात आली. यापुढेही 26 शाळांमध्ये अशाच प्रकारचा उपक्रम आयोजित करण्याचा समितीचा मानस आहे. पर्यावरण संवर्धन समितीच्या उपक्रमांना महापालिका शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत आहे.